देवेंद्र फडणवीसांना कोर्टाचे आदेश, पुढील सुनावणीस हजर राहा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/5-1.jpg)
मुंबई|महाईन्यूज|
२०१४ च्या निवडणूक शपथपत्रात दोन फौजदारी गुन्ह्याची माहिती दडवल्याप्रकरणी न्यायालयाने माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तात्पुरता दिलासा दिला आहे. परंतु, २४ जानेवारी रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीस कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहण्याचे निर्देश मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने दिले आहेत.
फौजदारी गुन्ह्याची माहिती फडणवीस यांनी दडवल्याची तक्रार अॅड सतीश उके यांनी केली होती. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. डिसेंबर महिन्यात न्यायालयाने फडणवीस यांना समन्स बजावले होते. शनिवारी फडणवीस यांच्या वकिलांनी न्यायालयात व्यक्तीगत उपस्थितीतून सूट मिळावी, अशी विनंती केली होती. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पाहणी दौरे आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यातील व्यस्ततेमुळे फडणवीस यांनी न्यायालयात उपस्थित राहता येत नसल्याचे न्यायालयाला म्हटले होते.
न्यायालयाने त्यांनी विनंती मान्य करत तात्पुरता दिलासा दिला. परंतु, पुढील सुनावणी २४ जानेवारी रोजी निश्चित करण्यात आली असून त्या सुनावणीत फडणवीस यांना कुठल्याही परिस्थितीत उपस्थित रहावे लागेल, असे न्यायालयाने बजावले आहे. उपस्थितीतून कुठलीही सुट पुढच्या वेळेस दिली जाणार नाही, असेही न्यायालयाने शनिवारी आदेशात स्पष्ट केले.