breaking-newsमहाराष्ट्र

दुष्काळी भागांत पावसाचा हलका दिलासा

  • मोसमी पाऊस दोन दिवसांत राज्य व्यापणार

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सध्या वेगात सुरू असून, शनिवारी (२२ जून) त्यांनी मध्य महाराष्ट्रातील आणखी काही भागांबरोबरच मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळी भागातही प्रवेश केला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पावसाची दीर्घ प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. पुणे, सोलापूर, लातूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद, नागपूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर आदी भागांत पाऊस बरसला. मोसमी वारे दोन ते तीन दिवसांमध्ये राज्य व्यापणार आहे. कोकण विभागासह उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मोसमी वारे यंदा तब्बल दोन आठवडय़ांच्या विलंबाने राज्यात दाखल झाला आहे. कोकण विभागासह मध्य महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस कोसळला आहे. मात्र, त्याचे प्रमाण यंदा कमी होते. मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडला नाही. पाण्याचे साठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे मोसमी पावसाकडे सर्वाचेच डोळे लागले आहेत. पूर्वमोसमी पाऊस न झालेल्या मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी शनिवारी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना हलका दिलासा मिळाला आहे.

सोलापूरमध्ये मोसमी पाऊस

सोलापूर शहरासह उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यांमध्ये मोसमी पाऊस बरसला. त्यामुळे या भागात समाधानाचे वातावरण दिसून आले. मात्र दुष्काळाचे सर्वाधिक चटके सोसणाऱ्या सांगोला व मंगळवेढय़ासह अन्य भागात पावसाची प्रतीक्षा आहे. शहरात मध्यरात्रीनंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विशेषत: दुष्काळी भागात मुक्या जनावरांसाठी चारा तरी उपलब्ध होऊ शकेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

बीड, उस्मानाबादमध्ये जोरदार पाऊस

बीड आणि उस्मानाबाज जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून फक्त ढगांची गर्दी होती. दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री चांगली सुरुवात केली. ढगाळ वातावरण आणि जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने सुरुवात केल्यामुळे हवेत सुखद गारवा जाणवू लागला आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये पावसाची दमदार हजेरी लागली आहे. बीड जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता सोसणाऱ्या बळिराजाला पावसाने दिलासा दिला आहे. शनिवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यातील ४५ महसूल मंडळांत वरुणराजा बरसला. माजलगाव तालुक्यात सर्वाधिक २८.१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तीन तालुक्यांत पाऊस झाला नाही.  जोरदार पावसामुळे नदी, नाल्यांना पाणी आले आहे.

नांदेड, लातूरमध्ये पावसाच्या सरी

लातूर जिल्हा आणि नांदेडच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली. मोसमी पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा वाढत होता. मृग नक्षत्र संपत आले तरी मान्सूनपूर्व पावसाचीही चाहूल नव्हती. मात्र, शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे संपूर्ण लातूर जिल्हाभर पावसाच्या हलक्या सरी बरसल्याने हवेतील उकाडा काही प्रमाणात कमी झाला. नांदेड भागातही शुक्रवारी रात्री वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली.

मोसमी पाऊस जोर धरणार

नैर्ऋत्य मोसमी पावसाला यंदा चक्रीवादळासह विविध अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे ते राज्यात पोहोचण्यासाठी २० जूनपर्यंतची वाट पाहावी लागली. १९७२ नंतर प्रथमच इतक्या विलंबाने मोसमी वारे राज्यात दाखल झाले आहेत. मात्र, सध्या त्यांना पोषक स्थिती निर्माण झाली असल्याने दोन-तीन दिवसांत ते राज्यभर पोहोचून मोसमी पाऊस वेग धरणार आहे. शनिवारी (२२ जून) मोसमी वाऱ्यांनी मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी प्रगती केली. मध्य महाराष्ट्रात सोलापूपर्यंत ते पोहोचले असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. सध्या महाराष्ट्र, गोव्याच्या किनाऱ्यालगत समुद्राला उधाण आले आहे. अनेक भागात अंशत: ढगाळ स्थिती आहे. त्यामुळे मोसमी वारे दाखल होण्यासह पाऊस जोर धरणार असल्याची अपेक्षा आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button