दिल्लीत विद्यार्थ्यांची शालेय फी माफ, आमआदमी पक्षाचा निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/kejriwal_1561273453.png)
दिल्ली – दिल्ली सरकारने काही दिवसांपूर्वीच महिलांसाठी बस आणि मेट्रो प्रवास मोफत करण्याची घोषणा केली होती. पण आता महिलांपाठोपाठ विद्यार्थ्यांवरही दिल्ली सरकारने मेहरबानी दर्शवली आहे. सरकारने विद्यार्थ्यांची फी माफ करण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या मते, परिवाराच्या वार्षिक उत्पन्नाच्या आधारावर विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात येणार आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांना फी भरावी लागणार आहे. यानंतर शिष्यवृत्तीच्या स्वरूपात निश्चित रक्कम परत करण्यात येणार आहे.
वार्षिक उत्पन्न एक लाखपेक्षा कमी असणाऱ्या परिवारातील विद्यार्थ्याचे पूर्ण शुल्क माफ होणार आहे. एक ते अडीच लाख रूपये उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांची अर्धे शुल्क, तर अडीच ते 6 लाख रूपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांची 25% शुल्क परत करण्यात येणार आहे. दिल्ली सरकारच्या या योजनेचा सव्वा लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळणार नाही लाभ
दिल्ली सरकारने 12 वीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्कात सूट देण्याची घोषणा केली आहे. दिल्ली सरकारच्या आयपी विद्यापीठ, दिल्ली प्रौद्योगिकी विद्यापीठ, नेताजी सुभाष प्रौद्योगिकी विद्यापीठ, आंबेडकर विद्यापीठ आदींसह दिल्ली सरकारच्या विद्यापीठातील संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षीपासूनच या सुविधेचा लाभ मिळणार आहे. दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
शिष्यवृत्ती व्यतिरिक्त 5 हजार रूपये वेगळे मिळणार
सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्ड परिक्षेचे शुल्क देण्याची आवश्यकता नसल्याची शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली आहे. याअगोदर 1500 शुल्क भरावे लागत होते. यासोबतच दिल्ली सरकारच्या विद्यापीठ किंवा महाविद्यालयांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकार 5 हजार रूपये देणार आहे.