दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Sheila-Dixit.jpg)
मुंबई – दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दीक्षित यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शीला दीक्षित यांनी १५ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. दिल्लीतील एक्सॉर्ट रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९९८ ते २०१३ या काळात त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. दीक्षित यांच्या निधनावर काँग्रेसमधून शोक व्यक्त होत आहे. देशभरात काँग्रेसची पडझड होत असताना शीला दीक्षित यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या निधनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
Former Delhi Chief Minister & Congress leader Sheila Dikshit, passes away in Delhi at the age of 81 years. (file pic) pic.twitter.com/8rqv8qfnAQ
— ANI (@ANI) July 20, 2019
शीला दीक्षित यांनी तीन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री पद भूषावलं आहे. दिल्लीमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या मुख्यमंत्री म्हणून शीला दीक्षित यांना ओळखलं जातं. ३१ मार्च १९३८ रोजी शीला दीक्षित यांचा जन्म पंजाबमधील कपूरथला येथे झाला होता. शीला दीक्षीत यांचे शिक्षण दिल्लीमध्ये झालं आहे.
शीला दीक्षित यांनी १९८४ ते १९८९ पर्यंत उत्तर प्रदेशमधील कन्नौज लोकसभेच्या खासदार होत्या. १९८६ ते १९८९ या कालावधीत शीला दीक्षित यांनी केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली होती. शीला दीक्षित यांची २०१४ मध्ये केरळ राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. मात्र, त्यांनी २५ ऑगस्ट २०१४ मध्ये राजीनामा देत काँग्रेसमध्ये पूर्णकाळ कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला होता. यंदाच्या लोकसभा निवडुकीत शीला दिक्षीत यांना भाजपाच्या मनोज तिवारीकडून पराभवचा धक्का बसला आहे.