दाभोळकर पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक का नाही ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/bombay-high-court.jpg)
- तपास यंत्रणांवर हायकोर्ट कडाडले
- सीबीआयचे सहसंचालक आणि राज्याचे गृहसचिव यांना न्यायालयात हजर रहाण्याचे आदेश
मुंबई – दक्षिणेतील विचारवंत गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना कर्नाटक पोलीस महाराष्ट्रातून बेड्या ठोकून घेऊन जातात. तर महाराष्टात घडलेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील आरोपींच्या हातात बेड्या का ठोकल्या जात नाहीत.
तपासात सातत्याने अपयश का येते, असा संतप्त सवाल आज उच्च न्यायालयाने उपस्थित केला आणि तपास यंत्रणांना चांगलेच फटकारले. या प्रकरणात तपास यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत, असे स्पष्ट मत व्यक्त करून न्यायालयाने पुढील सुनावणीला सीबीआयचे दिल्लीतील सहसंचालक आणि पानसरे प्रकरणात महाराष्ट्राचे गृहसचिव यांना न्यायालयात हजर रहाण्याचे आदेश दिले.
कॉम्रेड गोविंद पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडाची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या विविध याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. या याचिकांवर आज न्या. एस.सी धर्माधिकारी आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी तपास यंत्रेणेने सादर केलेल्या अहवालावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रात घडणाऱ्या गुन्ह्यांबद्दल आमच्या तपास यंत्रणांना काहीच कसे कळत नाही? याचे आम्हाला कोडे पडलेले आहे.
महाराष्ट्रासारख्या राज्यात अशा घटना घडतात आणि त्याच्या तपासात काही निष्पन्न होत नाही हे या पुरोगामी राज्याला शोभणारे नाही. तपास यंत्रणांमध्ये कोणताही समन्वय नाही. हे उघड झाले आहे. तपासात प्रगती दिसुन येत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयात बोलावल्याशिवाय आता आमच्याकडे पर्याय नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.