दाऊदच्या भारतवापसीची संधी शरद पवारांमुळे हुकली – प्रकाश आंबेडकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/prakash-ambedkar-1.jpg)
दाऊद अब्राहिम भारताकडे सरेंड करण्यास तयार होता, मात्र शरद पवार यांच्यामुळे ही संधी हुकली असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. दाऊदसाठी आता भीक मागितली जाते आहे मात्र शरद पवारांनी ती संधी गमावली असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आंबेडकर भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. याबाबत शरद पवार यांनी खुलासा करावा अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
‘1993 च्या मुंबईत बॉम्बस्फोट आणि दंगलीचा मास्टरमाइंड असल्याचा संशयित आरोपी दाऊद भारताला द्या अशी भीक मागणाऱ्यांनी यापूर्वी आलेली संधी गमावलेली आहे. यापूर्वी ज्येष्ठ वकील राम जेठमलाणी यांनी दाऊद समर्पण करायला तयार आहे आणि तो न्यायालयीन प्रक्रियेतदेखील सहभागी होऊ इच्छितो असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे अध्यक्ष व तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना दिला होता’, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.
परंतु शरद पवार यांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केलं असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसंच या निर्णयात युपीए सरकार सुद्धा सहभागी आहे असं सांगण्यात आलं होतं असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे. ‘जर दाऊद समर्पण करायला तयार होता तर शरद पवार यांनी त्याचे आत्मसमर्पण करवून न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी का करुन घेतले नाही याचा खुलासा होणे आवश्यक आहे’, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.