दहिसर नदीच्या पात्रात गुराचा मृतदेह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/mv07.jpg)
मुंबई : प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या दहिसर नदीच्या पात्रात शुक्रवारी सकाळी शेणाबरोबर गुराचा मृतदेह वाहून आला. राष्ट्रीय उद्यानाबाहेर या नदीच्या काठावर वसलेल्या तबेल्यांमधून मृतदेह आणि शेण वाहून आल्याचा आरोप नदी स्वच्छता मोहिमेतील कार्यकर्त्यांनी केला आहे. नदी सुशोभीकरणाच्या नावावर कोटय़वधींचा खर्च करणारे पालिका प्रशासन तबेलामालकांना चाप कधी लावणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानाबाहेरच्या बाजूस दहिसर नदीकिनारी पाच-सात तबेले आहेत. या तबेल्यांमधून नदीपात्रात गुरांचे मृतदेह, शेण आणि इतर राडारोडा सर्रास टाकला जातो. नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या या प्रकाराविरोधात दोन वर्षांपासून ‘रिव्हर मार्च’चे कार्यकत्रे प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र नदीचे प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढतेच आहे. शुक्रवारी सकाळी ‘रिव्हर मार्च’चे कार्यकर्ते गोपाळ झवेरी यांना नदीत गुराचे मृत शरीर वाहून आल्याचे दिसले. आसपास मोठय़ा प्रमाणावर शेणाचा थरही साचला होता.
नदी स्वच्छतेची जबाबदारी पालिकेची असल्याने त्यांनी पालिका प्रशासनाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. मात्र स्वच्छतेसाठी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांकडे आवश्यक साहित्यच नव्हते, असा आरोप झवेरी यांनी केला. शिवाय शेणाचा थर पाहून कामगारांनी नदीपात्रात उतरण्यासही नकार दिल्याचे त्यांनी सांगितले. तबेलामालकांच्या मुजोरीबाबत गेल्या दोन वर्षांपासून आम्ही सातत्याने पालिका आणि पोलिसांकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र तबेलामालकांना नोटीस आणि शे-दोनशे रुपयांचा दंड आकारण्याखेरीस प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याचे झवेरी म्हणाले.
तबेलामालकांची मुजोरी
यापूर्वीदेखील तबेलामालकांची मुजोरी समोर आली आहे. २०१६ मध्ये या ठिकाणी सात गुरांचे मृतदेह नदीपात्रात वाहून आले होते. त्यानंतर पात्रात वाहून येणारे शेण रोखण्यासाठी पालिकेने गटारांच्या मुखाशी लोखंडी जाळ्या बसविल्या. त्यादेखील दोन वेळा गायब करण्यात आल्या.
वाहतुकीपेक्षा दंड त्रासदायक
मृत गुरे आणि शेणाला वाहून नेण्यासाठी बराच खर्च होतो. तो खर्च दंडाच्या रकमेपेक्षा जास्त असल्याने तबेल्यांचे मालक नदीच्या पात्रात गुरे आणि शेण टाकत असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
आजारांची शक्यता
एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गुरांचे मृतदेह नाल्यात टाकले जात असल्याने रहिवाशांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. ही गुरे नक्की का मृत्युमुखी पडली, त्यांना साथीचा आजार झाला होता का, विष देऊन हत्या झाली आहे का, इतर गुरांनाही असा आजार झाला आहे का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे राहतात. साथ असेल तर त्याचा धोका स्थानिकांना होऊ शकतो, असे स्वच्छ नदी अभियानातील कार्यकर्त्यांनी सांगितले.
शुक्रवारच्या घटनेची दखल घेतली असून तबेलामालकांना समज देण्यात येईल. या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार आमच्या हातात नसून ते पोलिसांकडे आहेत.
– रमाकांत बिरादार, साहाय्यक आयुक्त, ‘आर’ मध्य विभाग