.. तर रिझव्र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/rbi-2.jpg)
डॉ. नरेंद्र जाधव यांचे मत
गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझव्र्ह बँकेच्या स्वायत्ततेवरच शंका उपस्थित होत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या रिझव्र्ह बँकेची स्वायत्तता काढली गेली, तर रिझव्र्ह बँकेचा गव्हर्नर हा राज्यपालाप्रमाणे नामधारी होईल, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी रविवारी व्यक्त केले.
दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्स, लायन्स इनोव्हेशन फोरम, आकुर्डी येथील सूर्या ग्रुपतर्फे आयोजित व्याख्यानमालेत ‘भारतीय अर्थव्यवस्था : आजची आणि उद्याची’ या विषयावर जाधव बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले.
डॉ. जाधव म्हणाले, जीएसटीचा निर्णय क्रांतिकारी आहे. त्याच्या अंमलबजावणीत गडबड झाल्याने त्यावर टीका झाली. त्याची रचना दोन स्लॅबवर आणली जाणार असून त्यामुळे कररचना व्यवस्थित होईल. बेरोजगारीचा प्रश्न आपल्यासमोर आहे. मुद्रा लोनमधून अनेकांना रोजगार मिळाल्याचा दावा साशंक आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत नोकऱ्या महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.