breaking-newsपुणेमहाराष्ट्र

तबल्याचा अवखळ ‘खेळिया’ उलगडला

उस्ताद झाकीर हुसेन यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान

केवळ एकल वादनच नव्हे,तर गायन, तंतुवाद्य आणि नृत्याची संगत अशी ‘चौमुखी’ तबलावादनाची ‘आस’ महत्त्वाची.. उपज अंगाने वेगळ्या वाटा शोधल्या नाहीत तर कलाकार केवळ गुरूची ‘कार्बन कॉपी’ होण्याची शक्यता.. पुस्तकी वादन  आणि स्वरमंचावरचे वादन यातील फरक समजून घेत तबलावादन करणे गरजेचे.. कमीत कमी वेळात शब्दार्थ आणि भावार्थाची उकल करणाऱ्या चित्रपट संगीताची जादू अनुभवणे गरजचे.. तबल्याचा अवखळ ‘खेळिया’ उस्ताद झाकीर हुसेन यांचा प्रवास रविवारी त्यांच्याशी झालेल्या गप्पांतून उलगडला आणि टाळ्यांच्या कडकडाटात रसिकांनी या ‘तबला नवाज़ा’ला कुर्निसात केला.

पु. ल. परिवार आणि आशय सांस्कृतिकतर्फे आयोजित ‘पुलोत्सवा’त ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते उस्ताद झाकीर हुसेन यांना ‘पु. ल. स्मृती सन्मान’ प्रदान करण्यात आला. टोनी झाकीर, प्रा. रमेश गंगोली, वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार या वेळी उपस्थित होते. रोहन प्रकाशनतर्फे प्रणव सखदेव यांनी अनुवादित केलेल्या ‘माझे तालमय जीवन’ या झाकीर हुसेन यांचा प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले. उत्तरार्धात प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी झाकीर हुसेन यांच्याशी संवाद साधला.

उस्ताद विलायत खाँ, माझ्या जन्मानंतर पाळण्यात ठेवलेले छोटे तबले, तबलाजोडी चादरीत बांधून बसने प्रवास करीत अब्बाजी उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांना दर रविवारी ठेका देण्याचे केलेले काम अशा आठवणींना झाकीर हुसेन यांनी उजाळा दिला. अब्बाजी, उस्ताद निजामुद्दीन खाँ, पं. सामता प्रसाद, पं. किशन महाराज अशा दिग्गज कलाकारांच्या स्पर्धेत माझा कसा निभाव लागणार हा प्रश्न होता. पण, याच कलाकारांनी मला संधी दिली. एकदा विमान उशिरा आल्यामुळे पं. सामता प्रसाद येऊ शकले नाहीत. त्या वेळी सितारा देवी यांच्या नृत्याला मी तबलासाथ केली. अब्बाजी आजारी असल्याने मी पं. रविशंकर यांच्या सतारवादनाला साथ केली. तर, पं. किशन महाराज येऊ न शकल्याने मी उस्ताद विलायत खाँ यांच्यासमवेत वादन केले होते, असेही त्यांनी सांगितले. वेगवेगळ्या घराण्याचे तबलावादन ऐकणे हादेखील एक रियाज असतो. वसंतराव आचरेकर तबल्याच्या साथीला नसतील त्यादिवशी पं. कुमार गंधर्व यांचे गायन वेगळे असायचे, असेही त्यांनी सांगितले.

झाकीर हुसेन यांनी लय, तालाने केवळ सुरांनाच संगत केली नाही, तर शब्दांना हृदयापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पाय जमिनीवर असून चेहरा आकाशापर्यंत, अशी उंची गाठलेल्या कलाकाराला मी वंदन करतो, असे राजदत्त म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button