डासांची ४५०८ उत्पत्तिस्थाने नष्ट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/mv01-1.jpg)
चार महिन्यांत पालिकेची कारवाई; झोपडपट्टय़ा, उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मात्र उपाययोजनांकडे दुर्लक्ष
मुंबई : पावसाळ्यात हिवताप आणि डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पालिकेने कंबर कसून गेल्या चार महिन्यांमध्ये अॅनॉफेलिस आणि एडिस डासांची अनुक्रमे ७७३ आणि ३,७३५ उत्पत्तिस्थाने नष्ट केली. मात्र डासांची उत्पत्तिस्थाने निर्माण होऊ नयेत यासाठी झोपडपट्टय़ा आणि उच्चभ्रू वस्त्यांमधील रहिवासी ठोस उपाययोजना करीत नसल्यामुळे पावसाळ्यात साथीच्या आजारांना आमंत्रण मिळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाळ्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाने जानेवारी २०१९ पासून डास प्रतिबंध उपाययोजना हाती घेतली आहे. गेले चार महिने डासांची उत्पत्तिस्थाने शोधून ती नष्ट करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत तब्बल ८५० ते ९०० कर्मचारी सहभागी झाले आहेत.
अॅनॉफेलिस डासामुळे हिवतापाच्या साथीचा प्रादुर्भाव होत असून या डासाच्या अळ्या स्वच्छ पाण्यात आढळतात. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने जानेवारीपासून झोपडपट्टय़ा आणि उच्चभ्रू वस्त्यांमधील पाण्याच्या टाक्यांची तपासण्याची मोहीम हाती घेतली होती. जलवाहिन्या, नादुरुस्त वॉल्व्हमधून सतत होणारी गळती, साचून राहणारे पाणी आदी ठिकाणी अॅनॉफेलिस डासाची उत्पत्तीस्थाने निर्माण होतात. कीटकनाशक विभागाने जानेवारीपासून आजतागायत मुंबईत तब्बल एक लाख ३९ हजार ३०५ ठिकाणांची पाहणी केली. पाणी साठवून ठेवण्यात येणाऱ्या ७७३ पिंपांमध्ये अॅनॉफेलिस डासांची उत्पत्तिस्थाने आढळली. ही उत्पत्तिस्थाने नष्ट करण्यात आली. त्याचबरोबर डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या एडिसच्या उत्पत्तिस्थांनांचा शोध घेण्यासाठी तब्बल ३४ लाख ८२ हजार ६४७ ठिकाणी तपासणी केली. यापैकी तीन हजार ७३५ ठिकाणी लारवा आढळून आल्या. या तीन हजार ७३५ ठिकाणची एडिस डासाची उत्पत्तिस्थाने नष्ट करण्यात आली. उच्चभ्रू वस्त्यांमधील घराघरांमधील शोभेच्या झाडांच्या कुंडय़ांखालील थाळीमध्ये, तसेच फुलदाणी, वस्त्यांमधील पाण्याची पिंपे आदी ठिकाणी एडिसची उत्पत्तिस्थाने आढळून आली.
डासांची उत्पत्तिस्थाने निर्माण होऊ नयेत यासाठी सूचना करूनही काळजी न घेणाऱ्या सुमारे दोन हजार ७२४ जणांवर पालिकेने नोटीस बजावली असून पालिकेच्या सूचना धुडकावणाऱ्या ५४ जणांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. उपाययोजना करण्यात हेळसांड करणाऱ्यांविरुद्ध पालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या चार महिन्यात दंडात्मक कारवाईपोटी पालिकेच्या तिजोरीत आठ लाख ३२ हजार ५०० रुपये जमा झाले आहेत.
पालिकेच्या सूचना
जलवाहिन्यांची जोडणी, तुटलेल्या जलवाहिन्या, नादुरुस्त वॉल्व्ह यातून सतत पाण्याची गळती होते आणि त्यामुळे हिवतापाचा प्रादुर्भाव करणाऱ्या अॅनॉफेलिस डासांची उत्पत्तिस्थाने निर्माण होतात. त्यामुळे जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर करण्याची सूचना पालिकेकडून नागरिकांना करण्यात आली आहे. त्याचबरोबर पाणी साठवून ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे पिंप आठवडय़ातून एकदा पूर्ण रिकामी करून कोरडी करावी. अन्यथा पाण्याने भरलेल्या पाण्यावर पातळ कापड बांधून ठेवावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
– राजन नारिंग्रेकर, कीटकनाशक अधिकारी