“डाऊन सिंड्रोम’विषयक पुण्यात आंतरराष्ट्रीय परिषद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/down-syndrome.jpg)
- भारतात दरवर्षी 30 हजार बाळांचा होतो जन्म
पुणे – “डाऊन सिंड्रोम’ हा जनुकीय विकार असलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्याच्या दृष्टीकोनातून काम करणाऱ्या “डाऊन सिंड्रोम फेडरेशन ऑफ इंडिया’ (डीएसएफआय) या संस्थेची दुसरी आंतरराष्ट्रीय डाऊन सिंड्रोम परिषद पुण्यात होणार आहे. येत्या 31 मे ते 2 जून या कालावधीत पुण्यात “द कोरिंथिअन्स रीसॉर्ट अँड क्लब’ येथे ही परिषद घेतली जाणार असून डाऊन सिंड्रोमविषयी जनजागृती करणे आणि डाऊन सिंड्रोम असलेल्या व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे आदी गोष्टी केल्या जाणार आहेत.
“डीएसएफआय’ संस्थेच्या संस्थापिका डॉ. सुरेखा रामचंद्रन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात दरवर्षी जन्मास येणाऱ्या डाऊन सिंड्रोम असलेल्या बाळांची संख्या जवळपास 30 हजार असल्याचे रामचंद्रन यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “डाऊन सिंड्रोम हा आजार नव्हे तर जनुकीय रचनेशी संबंधित अशी एक प्रकारची “मेडिकल कंडिशन’ आहे. डाऊन सिंड्रोम असलेली मुले “मेंटली रीटार्डेड’ असल्याचा सार्वत्रिक समजही तितकाच चुकीचा आहे. डाऊन सिंड्रोमसारखे जनुकीय विकार काही विशिष्ट ठिकाणच्या व्यक्तींमध्ये का अधिक प्रमाणात आढळतात, हे जाणून घेण्यासाठी सखोल संशोधन करण्याची आवश्यकता आहे.”
“इंडिया इंटरनॅशनल डाऊन सिंड्रोम कॉन्फरन्स’ या परिषदेत पुण्यातील डॉ. वामन खाडिलकर, डॉ. राजीव शारंगपाणी, डॉ. अर्चना कदम, डॉ. रंजन जोशी, डॉ. कौमुदी गोडबोले, डॉ. उषा प्रताप आदी तज्ज्ञ डॉक्टर संवाद साधणार आहेत. पुण्यातील डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांची 30 कुटुंबे या परिषदेत भाग घेणार आहेत. तसेच 182 पालक, डाऊन सिंड्रोम असलेली 89 मुले व त्यांच्या भावंडांसह उपस्थित राहणार आहेत.