जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता;मान्सून केरळात दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/rain.jpg)
नवी दिल्ली : यंदा मान्सून ठरलेल्या वेळेपूर्वीच केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सून आणि हवामानविषयक माहिती देणाऱ्या स्कायमेटनुसार (Skymet) दक्षिण पश्चिम मान्सून यावर्षी 30 मे रोजीच केरळात दाखल झाला आहे. गेल्या वर्षी मान्सून 8 दिवस उशीरा केरळमध्ये पोहोचला होता.
हवामान विभागाने, गेल्या आठवड्यात मान्सून 1 जूनपर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता. मात्र मान्सून 1 जूनपूर्वीच दाखल झाला आहे. त्यामुळे हवामान खात्याने 30 आणि 31 मे रोजी, तसंच जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. भारतात जून ते सप्टेंबर याकाळात दक्षिण-पश्चिम मॉन्सून पडतो.
2 ते 4 जून दरम्यान मुंबई व उपनगरामध्ये पावसाची शक्यता आहे. यादरम्यान कोकण गोव्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.
मान्सून साधारणत: 1 जून रोजी केरळात दाखल झाल्यानंतर 5 जून रोजी गोवा, कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश आणि ईशान्य या राज्यांमध्ये पोहचता. मात्र यावेळी मान्सूनच्या लवकर येण्यामुळे पाऊसही लवकरच सुरु होण्याचा अंदाज आहे.
हवामान खात्यानुसार, 10 जून रोजी मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये दाखल होऊ शकतो. याशिवाय 15 जून रोजी गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारमध्ये मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे.
अनेक दिवसांपासून कडक उन्हानंतर गुरुवारी सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये तापमानाचा पारा खाली आला असून थंड वारा वाहत आहे. वाऱ्याचा कल बदलला असून दक्षिणपूर्व वारे वाहत आहेत. वातावरणात काही प्रमाणात गारवा आला आहे.