जळगावमध्ये उद्यापासून दर आठवड्यांतून 2 दिवस कडकडीत लॉकडाऊन
![A complete curfew in Parbhani from 7 pm to 31 March this evening](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/CoroanLockdown-4-1.jpg)
जळगाव – कोरोनाच्या संकटात खबरदारीचा उपाय म्हणून जळगाव महापालिकेने आता दर आठवड्याला शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असून येत्या सोमवारपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात दूध, औषधे तसेच किराणा अशा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत.
प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस दुकाने उघडी करण्यात परवानगी दिली असली तरी महापालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना कोरोनाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे बंधन घालून दिले आहे. प्रत्येक दुकानदाराला फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, हँड सॅनिटायझरचा वापर, ट्रायल रूम बंद ठेवणे, दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहक येऊ न देणे, होम डिलिव्हरी, दुकानदार, कर्मचारी तसेच ग्राहकांनी मास्कचा वापर करणे, अशा प्रकारच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू असून दररोज शेकडोंच्या संख्येने नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. जळगाव शहरात तर परिस्थिती खूपच गंभीर होत चालली आहे. त्यामुळे जळगाव शहर हे कोरोनाचे जळगाव जिल्ह्यातील प्रमुख हॉटस्पॉट आहे.