breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्तीचे प्रतीकात्मक विसर्जन!

गणेशोत्सवातील प्रदूषण टाळण्यासाठी गणेशभक्तांनी गेल्या काही वर्षांपासून विविध पर्याय अमलात आणण्यास सुरुवात केली आहे. पाण्याचे प्रदूषण न करता विसर्जित होणाऱ्या मूर्ती हा पर्याय त्यापैकीच एक.. आता यापुढे एक पाऊल टाकत मूर्तीचे केवळ प्रतीकात्मक विसर्जन करण्याचा पर्यायही रुजत आहे. धातूच्या मूर्तीचे पूजन करण्यासोबतच पारंपरिक शाडू मातीच्या मूर्तीची उंचीही कमी करण्याचा मार्गही अनेकांनी अवलंबला आहे.

गणेशोत्सवाच्या काळातील ध्वनी आणि जलप्रदूषण हा चिंतेचा विषय आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवण्यात येणाऱ्या मूर्तीमध्ये अविघटनशील घटक, तसेच रासायनिक रंग असल्याने विसर्जनानंतर जलप्रदूषण होते. त्यामुळे काही वर्षांपासून शाडूच्या मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्तीला प्राधान्य देण्यात येत होते; परंतु आता गणेशभक्तांनी विसर्जनाची आवश्यकता नसलेल्या गणेशाची स्थापना करण्यास सुरुवात केली आहे.

धातू, चांदी किंवा संगमरवराच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करायची आणि नंतर त्याचे घरातच प्रतीकात्मक विसर्जन करून पुन्हा देव्हाऱ्यात ठेवायची, अशी ही संकल्पना आहे. अनेक मुंबईकर ही संकल्पना राबवत आहेत.

अनुजा जोशी-शिर्के  या दरवर्षी संगमरवराच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतात. मात्र कुठलीही विसर्जन मिरवणूक न काढता घरीच गणपतीचे प्रतीकात्मक विसर्जन करतात. यामुळे ध्वनिप्रदूषण होत नाही, की जलप्रदूषण होत नाही, असे त्यांनी सांगितले.

बोरिवलीत राहणाऱ्या वेदांती गांधी यांनीदेखील चांदीची गणेशमूर्ती बनवून घेतली आहे. धार्मिक परंपरेप्रमाणे या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून घरीच प्रतीकात्मक विसर्जन केले जाते, असे त्यांनी सांगितले. गणेशमूर्तीचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन न केल्याने धार्मिकतेला बाधा पोहोचत नाही, असेही त्या म्हणाल्या.

कमी उंचीच्या मूर्तीवर भर

पर्यावरणपूरक गणेशमूर्तीना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. शाडू मातीच्या आणि कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या मूर्ती गेल्या काही वर्षांपासून आणल्या जात आहेत. आता गणेशमूर्तीची उंची कमी ठेवण्यावर भर दिला जात आहे. पूर्वी शाडूच्या मुर्ती होत्या आणि त्याचा आकार लहान होता. त्यामुळे आम्ही  पुन्हा शाडू मातीच्या गणेशमूर्ती आणण्यास सुरुवात केली आहे. त्याचा आकारही कमी ठेवतो, असे विलेपार्ले येथील शुभंकर दळवी यांनी सांगितले. चेंबूरचे विजय सांगोले  पंधरा वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. दरवर्षी घरीच कृत्रिम हौद बनवून ते छोटय़ा मूर्तीचे विसर्जन करतात. विसर्जनानंतर  मातीचा वापर करून पुढच्या वर्षी त्यांच्या घरातील श्रीगणेशाची मूर्ती आकाराला येते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button