छत्रपती शाहू सेतूचे नाव बदलण्याचा आमदारांचा घाट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/corporation1-6.jpg)
नावबदलाबाबत महापालिकेला दिले पत्र
पुणे – कसबा पेठ ते शिवाजीनगर तोफखान्याला जोडणाऱ्या तसेच डेंगळे पुलाशेजारी होत असलेल्या नवीन समांतर पुलाला छत्रपती शाहू सेतू हे नाव देण्याच्या प्रस्तावाला नाव समितीने आणि महापालिकेच्या मुख्य सभेने मंजुरी दिली आहे. मात्र हे नाव बदलण्याचा हालचाली सुरू असून तसे पत्र सत्ताधारी आमदाराने महापालिका प्रशासनाला दिले आहे. यापूर्वीच पुलाच्या नावाला मुख्य सभेने मंजुरी देवूनही प्रशासनाने दुसऱ्या नावाचे पत्र कसे स्विकारले, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मुठा नदीवरील डेंगळे पुलाचे आयुष्य लक्षात घेऊन आणि या पुलावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी या पुलास समांतर नवीन पूल उभारण्यासाठी तत्कालिन नगरसेवक अजय तायडे यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार कसबा पेठ ते शिवाजीनगर तोफखाना यांना जोडणाऱ्या तसेच डेंगळे पुलाला समांतर असा पूल बांधण्याला मंजुरी मिळाली.
या पुलाच्या कामासाठी 23 कोटी रुपये अंदाज पत्रकात तरतूद करण्यास माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी मदत केली. या नव्या पुलाला “छत्रपती शाहू सेतू’ असे नाव देण्याचा प्रस्ताव तायडे, बोडके, तत्कालिन नगरसेविका निलिमा खाडे, संगीता तिकोणे या चौघांनी नाव समितीला दिला. नाव समितीने या प्रस्तावाला 19 जुलै 2016 रोजी मंजुरी देऊन तो महापालिकेच्या मुख्य सभेत मंजुरीसाठी ठेवला. या प्रस्तावाला मुख्य सभेनेही 23 ऑगस्ट 2016 रोजी मंजुरी दिली आहे. नव्याने साकारणाऱ्या पुलाचे काम काही दिवसांतच पूर्ण होणार असतानाच त्याचे नाव बदलण्याच्या हालचाली सत्ताधाऱ्यांकडून सुरू झाल्या आहेत.
शिवाजीनगरचे आमदार विजय काळे यांनी तसे पत्र महापालिका प्रशासनाला दिले आहे. “छत्रपती शाहू सेतू’ या नाव ऐवजी “संत शिरोमणी गोरोबाकाका कुंभार’ असे नाव देण्यात यावे असे या पत्रात नमूद केले आहे. या पत्रावर पुढील कार्यवाही करण्याचा शेरा अतिरिक्त महापालिका आयुक्त कार्यालयाकडून आठ जुलै रोजी मारला आहे. हा प्रस्ताव लवकरच महापालिकेच्या नाव समितीसमोर ठेवला जाणार असून, त्यावर नाव समिती काय निर्णय घेते, हे पहावे लागणार आहे.
दरम्यान, एखाद्या वास्तूच्या नावाला महापालिकेच्या नाव समितीने आणि मुख्य सभेने मंजुरी दिल्यानंतर पुन्हा त्याच वास्तूस दुसरे नाव न देण्याचे महापालिकेचे धोरण आहे. असे असताना दुसरे नाव देण्याचे पत्र पालिका प्रशासन कसे स्विकारते, यावर पुढील कारवाई करावी, असा शेरा कसा मारू शकते. महापालिकेच्या मुख्य सभेचे निर्णय पालिका अधिकाऱ्यांना माहिती नसतात का, असाही प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.
शाहू महाराजांचे नाव दिले असल्यास हरकत नाही : आ. विजय काळे
स्थानिक नागरिकांनी मागणी केल्याने नव्याने होत असलेल्या पुलाला संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार असे नाव देण्याचे पत्र पालिका प्रशासनास दिले. छत्रपती शाहु सेतू असे नाव मंजुर केले असल्यास ते देण्याला आपली हरकत नसल्याचे आमदार विजय काळे यांनी सांगितले.