‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम वादात, संभाजीराजेंनी कलाकारांंना दिला इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/4-16.jpg)
मुंबई |महाईन्यूज|
‘झी मराठी’ या वाहिनीवर सुरू असलेला ‘चला हवा येऊ द्या’ हा विनोदी कार्यक्रमक वादात सापडला आहे. कारण या कार्यक्रमातील एका भागामध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचा फोटो मॉर्फ करून या मालिकेतील अभिनेत्यांच्या रुपात वापरण्यात आला आहे. यावरूनच खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले असून त्यांनी इशारा दिला आहे.
‘लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्ध्तीने वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे. निलेश साबळे तसेच झी वाहिनी ने या गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिनी व दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.
‘याचा अर्थ असा नाही की आपण काहीही करावं’
‘आमचे घराणे हे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापूरला कलानगरीमध्ये रूपांतरित केले होते. सयाजीराव गायकवाडांचे योगदानही काही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची आणि पोषक वातावरणाची गरज असते. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण काहीही करावं. आम्हा सर्व इतिहास प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,’ अशा शब्दांमध्ये संभाजीराजे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.