breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

ग्रामपंचायत कार्यालय माहीत नसलेला माणूस लाटेत खासदार होऊन पार्लमेंटमध्ये गेला

  • विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची खंत

पिंपरी – दर पंधरा-वीस वर्षानंतर देशात एक हवा येत असते. 2014 मध्ये सुध्दा अशीच एक हवा आली, आणि त्याने सर्वांना उध्वस्त करून सोडलं. त्यामुळेच आपल्या पक्षाच्या खासदार, आमदारांना आज माजी म्हणावं लागत आहे. भाजपच्या लाटेमुळे कधी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात न गेलेला व्यक्ती थेट खासदार होऊन देशाच्या पार्लमेंटमध्ये गेला. त्याला जनतेचे प्रश्न कसे सोडवायचे हे कळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. याचा दोष मोदींना द्यावा लागले, असा आरोप परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भोसरी येथे भाजप आणि मोदी सरकारवर केला.

 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या बुथ कमिटीचा मेळावा भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आज रविवारी (दि. 22) घेण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माजी आमदार विलास लांडे, अशोक पवार, बापूसाहेब पाठारे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नेते नाना काटे, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, माजी महापौर योगेश बहल, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर आदी यावेळी उपस्थित होते.

 

मुंडे म्हणाले की, दिल्लीतील रामलिला मैदानावर समाजसेवक आण्णा हजारे यांचे केंद्रातील तत्कालीन सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू होतं. त्यात देशभरातील तरुणाईचा मोठा सहभाग होता. माध्यमांतून आंदोलनाच्या बातम्या बघायला मिळत होत्या. तब्बल 31 दिवस सरकारच्या विरोधात बातम्या येत राहिल्यामुळे सरकारच्या विरोधात नागरिकांच्या मनामध्ये रोष निर्माण झाला. त्यामुळे लोकांनी सरकारच्या विरोधात पर्याय शोधण्यास सुरूवात केली. त्याचा फायदा उचलून भाजपने नरेंद्र मोदी मुख्यमंत्री राहिलेल्या गुजरातच्या विकासाचे मॉडेल देशासमोर आणले. मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषीत केलं. अच्छे दिनचे गाजर दाखविले. पंधरा लाख रुपये जनतेच्या खात्यात टाकण्याचे आश्वासन दिले. लाखो तरुणांना नोक-या देण्याचा शब्द दिला गेला. गेल्या चार वर्षात एकही आश्वासन केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारला पूर्ण करता आले नाही. त्यामुळे जनता पूर्णपणे वैतागली आहे. जनता आता भाजप विरोधात पर्याय शोधू लागली आहे, असे मुंडे म्हणाले.

…तर अजितदादा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत

मोदी लाटेमुळे 2014 मध्ये तरुणाई वेढी झाली होती. मोदींबरोबर 60 वर्षात आघाडी सरकारने काय केले असा प्रश्न विचारत होती. त्यांच्या वडिलांना नोक-या याच सरकारने दिल्या. ते सेवानिवृत्त झाले. आज हीच तरुणाई गेल्या चार वर्षापासून बेरोजगार म्हणून फिरू लागली आहे. त्यांची सरकारने घोर फसवणूक केल्याची जाणीव त्यांना करून देण्याची वेळ आली आहे. 2019 मध्ये होणा-या निवडणुकांमध्ये जनतेला भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी हा पर्यायी पक्ष वाटू लागला आहे. सरकारच्या विरोधातील मुद्दे घेऊन घराघरात जाऊन जनतेला पटवून सांगा. त्यामुळे निश्चितच परिवर्तनाची लाट येऊन आगामी काळात अजित दादा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button