गोवंडीत दुमजली घर कोसळून आठ जण जखमी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/mv01-2.jpg)
मुंबई : गोवंडी परिसरात रविवारी मध्यरात्री एक दुमजली घर कोसळून आठ जण जखमी झाले. या सगळ्यांवर शताब्दी आणि राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गोवंडी- शिवाजीनगर परिसरातील प्लॉट नंबर ४४ येथे मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना अचानक पोटमाळा कोसळला. शेजाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ढिगारा बाजूला केला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आठ जणांना बाहेर काढण्यात आले. त्यांना शताब्दी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. यातील जुबेदा बानू (वय ७०), आयशा सय्यद (वय २१) आणि नूरजहाँन सय्यद (वय ४५) या तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आले. इतर पाच जणांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे.