breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

गोरेगाव-पनवेल लोकल सहा महिन्यांनंतर?

सध्याच्या वेळापत्रकात समावेश करताना अडचणी

अंधेरीपर्यंत असणाऱ्या हार्बर मार्गाचा एप्रिल २०१८मध्ये गोरेगावपर्यंत विस्तार करण्यात आला असला तरी, हार्बरवरील डाऊन मार्गावरील सर्वात शेवटचे स्थानक असलेल्या पनवेल येथून गोरेगावकडे जाणारी लोकलसेवा सुरू होण्यासाठी आणखी सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या आणि गाडय़ांची संख्या पाहता गोरेगाव-पनवेल या लोकलसेवेचा त्यात समावेश करणे कठीण होत असल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, सहा महिन्यांनंतर याबाबत ठोस निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंधेरी आणि पश्चिम रेल्वेवरून हार्बरसाठी चर्चगेट ते अंधेरी मार्गावर लोकल गाडय़ा धावतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून अंधेरीपर्यंत असणाऱ्या हार्बर सेवेचा विस्तार करण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. कांदिवली तसेच मालाड स्थानकातून हार्बर मार्गासाठी, तर जोगेश्वरी, राम मंदिर आणि गोरेगाव स्थानकांतून हार्बरसाठी मोठय़ा संख्येने प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांची मागणी लक्षात घेता अंधेरीपर्यंत असणाऱ्या हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून एमयूटीपी-२ अंतर्गत विस्ताराचे काम २००९ साली हाती घेण्यात आले. या कामातील अनेक तांत्रिक अडथळ्यांमुळे काम पूर्ण होण्यासाठी डिसेंबर २०१७ उजाडले. अखेर विस्तारित हार्बर मार्गाचे उद्घाटन २९ मार्च २०१८ रोजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. विस्तारित मार्ग झाल्यानंतर १ एप्रिलपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंधेरीपर्यंतच्या ४२ आणि चर्चगेट ते अंधेरीपर्यंतच्या सात फेऱ्यांचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्यात आला. त्यानंतर पश्चिम रेल्वेने १ नोव्हेंबरपासून हार्बरवरील अंधेरीपर्यंत असणाऱ्या आणखी ११० लोकल फेऱ्यांचाही गोरेगावपर्यंत विस्तार केला. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

परंतु सध्या अंधेरी ते पनवेल अशी थेट सेवा असून त्याच्या १८ फेऱ्या होतात. त्यामुळे गोरेगावपर्यंत जाण्यासाठी प्रथम अंधेरीपर्यंतचा प्रवास पनवेलकरांना करावा लागतो. अंधेरी स्थानकात उतरल्यानंतर पुन्हा दुसरी लोकल पकडून गोरेगाव स्थानक गाठावे लागते. अशा प्रकारे दोन लोकल गाडय़ांचा आधार प्रवाशांना घ्यावा लागत असल्याने मनस्ताप होत आहे. गोरेगाव ते पनवेल लोकल सेवा पावसाळ्यानंतर सुरू करण्याचा प्रयत्न होता. मात्र आता आणखी सहा महिन्यांची प्रतीक्षा लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हार्बरवरील सध्याच्या वेळापत्रकात या सेवांचा समावेश केल्यास अन्य लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या लोकल फेऱ्यांची व गाडय़ांची संख्या पाहता गोरेगाव ते पनवेल लोकल फेऱ्यांचा समावेश करताना अडचणच असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही सेवा येण्यास विलंबच लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button