‘खेकड्यांनी भोकं पाडल्याने फुटले तिवरे धरण’, जलसंधारण मंत्र्यांचा अजब दावा
खेकड्यांनी भोकं पाडल्याने जे भगदाड पडलं त्यामुळेच तिवरे धरण फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. तिवरे धरण फुटणे ही एक नैसर्गिक आपत्ती होती. काही गोष्टी कुणाच्याही हातात नसतात. ही एक दुर्घटना होती. अधिकाऱ्यांशी आणि जुन्या जाणत्या ग्रामस्थांशी मी चर्चा केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे धरण खेकड्यांनी पोखरल्याने फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे.
चिपळूणमधलं तिवरे धरण फुटल्याने २३ जण वाहून गेले त्यापैकी १८ मृतदेह हाती लागले आहेत. एनडीआरएफच्या टीमकडून शोध कार्य आणि बचाव कार्य सुरू आहे. अशात जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचं अजब तर्कट समोर आलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला संताप आणणारं हे वक्तव्य आहे. खेकड्यांनी धरण फोडलं असेल तर गुन्हा कुणावर दाखल करायचा असाही प्रश्न सावंत यांनी विचारला आहे. २००० साली हे धरण बांधून पूर्ण झालं. मागच्या १५-१६ वर्षांपासून या धरणात पाणी साठत होतं. जेव्हा धरण गळू लागलं तेव्हा तक्रार करण्यात आली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. अशात आता जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी मात्र खेकड्यांनी भोकं पाडल्याने तिवरे धरण फुटलं असा अजब दावा केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा अजब दावा केला आहे. तिवरे धरण फुटल्याने शेजारच्या सहा ते सात गावांना या दुर्घटनेचा फटका बसला आहे
जी माहिती मला मिळाली त्यानुसार त्यादिवशी आठ तासांमध्ये १९२ मिमी. पाऊस पडला. आठ तासात धरणाच्या पाण्याची पातळी आठ मीटरने वाढली. या सगळ्या बाबीही लक्षात घेतल्या पाहिजेत. ही एक नैसर्गिक आपत्ती होती, काही गोष्टी टाळता येत नाही. दुरूस्तीचं काम निकृष्ट दर्जाचं होतं का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा शक्य होतं ते सगळं करण्यात आलं होतं असाही दावा तानाजी सावंत यांनी केला.