कोरोनाबाधीत आईचा मृतदेह पोतडीत घेऊन जा; रुग्णालय प्रशासनाचा मुलासोबत उर्मटपणा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/corona-4-1.jpg)
मुंबई | महाईन्यूज
मुंबईत कोरोनाचा कहर सुरू असताना महानगरपालिकेच्या एका रुग्णालयाचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बोरिवली येथील मुंबई महापालिकेच्या (BMC)शताब्दी रुग्णालय प्रशासनानं 21 वर्षीय मुलाला विना पीपीई किट आईचा मृतदेह पोतडीत ठेवण्यास भाग पाडलं. या घटनेनंतर रुग्णालयाच्या दोन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.
मिळालेली माहिती अशी की, मुंबईतील बोरिवली येथील मुंबई महानगरपालिकेच्या शताब्दी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडली. मृत महिलेचा मृतदेह पोतडीत ठेवण्यास तिच्या मुलाला रुग्णालय कर्मचाऱ्यांनी भाग पाडलं.
पीपीई किट देण्यास साफ नकार
मुंबई मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तनुसार, घर काम करणाऱ्या 50 वर्षीय पल्लवी उटेकर यांना 30 जूनला शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. मात्र, 2 जुलैला पल्लवी उटेकर यांचा मृत्यू झाल्याचा मुलगा कुणाल उटेकर याला रुग्णालयातून फोन आला. कुणाल तातडीने रुग्णालयात पोहोचला. रुग्णालय कर्माचाऱ्यांनी कुणालला त्याच्या आईचा मृतदेह पोतडीत ठेवण्यास सांगितलं. कुणालने पीपीई किटची मागणी केली, पण त्याला स्पष्ट नकार देण्यात आला. एवढंच नाही कुणाल कोविड वार्डात विना सिक्युरिटी गेला. आईचा मृतदेह प्लास्टिक पोतडीत पॅक केला.
रुग्णालय प्रशासनाची भूमिका
बीएमसी शताब्दी रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद नागरकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केलं आहे. तसेच या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. कुणाल हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याचं मातृछत्र हरपलं आहे. बोरीवली येथील गोखले कॉलेजमध्ये तो बीकॉम थर्ड ईअरचा स्टूडेंट आहे. कुणालचे 55 वर्षीय वडील पांडुरंग उटेकर हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांना बीएमसीच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.