breaking-newsमहाराष्ट्र

कोकण पर्यटनाला निधीची गरज

  • नाना पाटेकर यांचे प्रतिपादन

स्वच्छ, सुंदर व लांबलचक समुद्र किनारे कोकणाला लाभले आहेत. गोव्यापेक्षाही कोकण पर्यटनात आघाडीवर राहील. कोकणच्या पर्यटनातून जनमानसाची मान उंचावत असेल तर सरकारनेदेखील निधी दिला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कोकणाच्या पर्यटनाला निधी द्यावा, असे आवाहन नाम फाउंडेशनचे संस्थापक प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा दत्तक घ्यायची माझी पात्रता नाही. पण या जिल्ह्य़ाने मला दत्तक घेतले आहे त्यामध्ये मी तुमचा आभारी आहे, असे नाना पाटेकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या जिल्हा दत्तक घेण्याच्या विधानावर वक्तव्य केले. सावंतवाडी नगर परिषद बारावा पर्यटन महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर बोलत होते. या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उद्योजक अनंत भालेकर, डॉ. राजेश गुप्ता, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्य अधिकारी जयंत जावडेकर, अर्चना घारे, नगरसेवक अनारोजीन लोबो, शुभांगी सुकी, मनोज नाईक, आनंद नेवगी, राजू बेग, बाबू कुडतरकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, दीपाली भालेकर, नासीर शेख, सुरेंद्र बांदेकर, दीपाली सावंत, समृद्धी विर्नोडकर, उत्कर्षां सासोलकर, माधुरी वाडकर, परिमल नाईक, शाम सावंत, उदय नाईक तसेच मान्यवर उपस्थित होते. आपण मागील तीस वर्षांपूर्वीपासून सावंतवाडी पाहतोय. त्या वेळची सावंतवाडी आणि आजची सावंतवाडी यामध्ये जमीन- अस्मानचा फरक आहे. तो फरक चांगला झाला आहे. त्याचे श्रेय आपण दीपकला देतो, असेदेखील नाना पाटेकर म्हणाले. मोती तलाव स्वच्छ आहे. स्वच्छता नावाच्या अभियानापेक्षा आपण त्यांची स्वच्छता पाहायला हवी, असे त्यांनी सांगितले. लोकसंख्या वाढत आहे, परंतु पाणी, वीज, जमीन तेवढीच राहील. त्यामुळे पाणी बचत करून ते वाया जाणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. आपणास सरकार काय देईल, यापेक्षा निसर्गाने दिले आहे, ते आपण वाचवूया, असे आवाहनदेखील नाना पाटेकर यांनी केले. मराठवाडा, खान्देशसारखी दुष्काळी स्थिती कोकणात नाही. कोकणचा शेतकरी आत्महत्या करत नाही, त्याचा आपल्याला अभिमान वाटतो. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मराठवाडा, खान्देशमध्ये दुष्काळी स्थितीवर मात करणारी योजना आखली. आता पुणे येथील महात्मा फुले यांनी बांधलेले खडकवासला धरणाचा गाळ काढण्याचे कामदेखील हाती घेतले आहे, असे नाना पाटेकर यांनी सांगून पाण्याची क्षमता वाढविण्यासाठी हा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. गोवा राज्यात पर्यटन व्यवसाय वाढत असताना कोकणात तो का वाढत नाही. असा प्रश्न अभिनेता नाना पाटेकर यांनी उपस्थित केला. स्वच्छ, सुंदर, लांबलचक किनारे कोकणात आहेत. साधा स्पर्श झाला तरी आपणास आनंद होतो. त्याकडे सरकारने पर्यटनाच्या दृष्टीने पाहायला हवे. त्यातून जनमानसाची मान उंचावत असेल तर सरकारने निधी द्यायला हवा, असे पाटेकर म्हणाले. गोव्यापेक्षा कोकणात पर्यटनाला मोठा वाव आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोकणच्या पर्यटनाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करून मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या पर्यटनासाठी निधी दिला तर आम्ही उपकृत होऊ. आणि मुख्यमंत्र्यांना नक्कीच कोकणच्या हितासाठी धन्यवाद देऊ,असे श्री. पाटेकर म्हणाले. या वेळी सूत्रसंचालन प्रा. सुमेधा नाईक यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button