breaking-newsपुणेमहाराष्ट्र

काश्मीर ते कोल्हापूर सायकल मोहिमेदरम्यान पुण्यातील सायकलस्वाराचा अपघाती मृत्यू

पुणे : ॲग्रोवनचे आर्टिस्ट प्रवीण ताकवले (वय ३०) यांचे मंगळवारी (ता. २१) रात्री अपघाती निधन झाले. राजस्थानातील नागौर-जोधपूर राष्ट्रीय महार्गावरील नागडी गावाजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. ताकवले काश्मीर ते कोल्हापूर या सायकल भ्रमंती मोहिमेदरम्यान राजस्थानात गेले होते. ताकवले यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.

ताकवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जम्मू येथून १३ ऑगस्ट रोजी काश्मीर ते कोल्हापूर सायकल मोहिमेला सुरूवात केली होती. या मोहिमेत एकूण आठ सायकलस्वार सहभागी झाले होते. ते मंगळवारी बिकानेरहून जोधपूरला जात होते, त्याचवेळी हा अपघात झाला. ताकवले आणि त्यांचे तीन सहकारी रात्री नागडी गावाजवळील एका हॉटेलमध्ये जेवण करून पेट्रोलपंपावर ठेवलेल्या सायकली आणण्यासाठी चालत निघाले होते. तेव्हा एका भरधाव ट्रकने ताकवले यांच्यासहित त्यांच्या चार साथीदारांना जोरदार धडक दिली. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्ता सोडून खाली उतरला आणि रस्त्याच्या कडेने जात असणाऱ्या या चौघांना धडकला. ही धडक इतकी भीषण होती की यात ताकवले यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन जण जखमी झाले आहेत. उपस्थितांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही जखमींना उपचारासाठी जवळच्या खिंवसर रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती स्थिर आहे असेही समजते आहे.

अभिनव कला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेल्या ताकवले हे उत्कृष्ट डिझायनर आणि लोगो आर्टिस्ट म्हणून ओळखले जात होते. ते एक उत्तम ट्रेकर, धावपटू, जलतरणपटू आणि सायकलपटू होते. त्यांनी अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. ते दोन वर्षांपूर्वी पुणे ते कन्याकुमारी सायकल मोहिमेतही सहभागी झाले होते. पर्यावरणरक्षण आणि आरोग्यसंवर्धनासाठी लोकांनी घरून कार्यालयात येण्या-जाण्यासाठी सायकलचा वापर करावा, यासाठी ताकवले यांनी सायक्लोथॉन ही मोहीमही सुरू केली होती. ते स्वतः कार्यालयात येण्या-जाण्यासाठी कटाक्षाने सायकलचा वापर करत. ताकवले यांचे पार्थिव आज (ता. २३) दुपारपर्यंत पुण्यात आणले जाणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button