breaking-newsपुणेमहाराष्ट्र

कांदा दराचा शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही फटका

जुना कांदा साठवणुकीमुळे शेतक ऱ्यांच्या पदरी निराशा; घाऊक बाजारात कांद्याची मोठी आवक

घाऊक बाजारात जुन्या आणि नवीन कांद्याची मोठय़ा प्रमाणावर आवक सुरू झाली आहे. जुना कांदा बाजारात मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे. कांद्याला चांगले भाव मिळतील, या आशेने शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर कांदा साठवला होता. मात्र साठवणुकीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. एककीडे दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत असताना दुसरीकडे घाऊक बाजारात कांद्याचे दर कमी होऊनही ग्राहकांना मात्र प्रतिकिलो १५ ते २० रुपये या दरानेच कांदा खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकांनाही वाढीव दराचा फटका बसत आहे.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात शुक्रवारी दीडशे ते पावणेदोनशे ट्रकमधून कांद्याची आवक झाली. घाऊक बाजारात जुना आणि नवीन कांदा मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध झाला आहे. जोपर्यंत बाजारातील जुन्या कांद्याचा पुरवठा कमी होत नाही तोपर्यंत नवीन कांद्याला भाव मिळणार नाही. कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेने कांदा उत्पादक शेतक ऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर साठवणूक केली होती. घाऊक बाजारात अपेक्षेएवढे भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे, असे घाऊक बाजारातील कांदा व्यापारी विलास रायकर यांनी सांगितले.

जुन्या कांद्याला उपाहारगृहचालक, खानावळचालकांकडून मोठी मागणी असते. जुना कांदा सामिष पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जातो. नाताळात उपाहारगृहचालकांकडून जुन्या कांद्याला मागणी वाढेल. सध्या घाऊक बाजारात जुन्या कांद्याला प्रतिकिलो ७ ते ८ रुपये भाव मिळत आहे.

शेतक ऱ्यांच्या अपेक्षेएवढा हा भाव नाही. जुना कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जुना कांदा खरेदी करताना कांदा निवडून घ्यावा लागतो. जुन्या कांद्याची आवक थांबल्यानंतर नवीन कांद्याला मागणी वाढेल आणि त्यानंतर कांद्याला भाव मिळेल. पुढील १५ ते २० दिवस जुन्या कांद्याची आवक सुरू राहील, तोपर्यंत कांद्याला अपेक्षेएवढा भाव मिळणार नाही, असेही रायकर यांनी सांगितले.

किरकोळ बाजारात कांदा १५ ते २० रुपये किलो

घाऊक बाजारात कांद्याचा प्रतिकिलोचा भाव ७ ते ८ रुपये आहे. शहरातील किरकोळ बाजारात मात्र एक किलो कांद्याची विक्री १५ ते २० रुपये दराने केली जात आहे. ग्राहकांना कांदा जादा दराने खरेदी करावा लागत असला तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतकऱ्यांना प्रतिकिलोचा दर ४ ते ८ रुपये एवढाच मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button