कांदाप्रश्नी राज्य नाही तर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज : शरद पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/shard-pawar-speak_201906245891.jpg)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊसतोडणीच्या दरावर तोडगा काढला. यानंतर ते आता नाशिक दौरा करणार आहेत. हा दौरा कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांची भेट घेण्यासाठी केला जात आहे. शरद पवार त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. कांदा व्यापारांनी अघोषित संप पुकारल्यामुळे तोडगा काढण्यासाठी शरद पवार मध्यस्थी करणार आहेत. दुपारी 1 वाजता ते नाशिकमध्ये पोहोचणार आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून कांदा लिलाव बंद आहे. कांदा साठवणीवर मर्यादा घातल्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा अघोषित संप सुरुच आहे. यावर आता पवार आज तोडगा काढतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शरद पवारांनी मंगळवारी स्पष्ट केले होते की, मी नाशिकला जाणार आणि कांदा उत्पादकांना भेटून त्यांची भूमिका जाणून घेणार आहे. तसेच केंद्र सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांच्या हिताची नसल्याचे ते म्हणाले आहेत. आयातीला पाठिंबा आणि साठा करण्यासाठी मर्यादा हे धोरण आहे.
250 क्विंटल कांदा ठेवण्याची मर्यादा आहे. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादेला व्यापाऱ्यांकडून विरोध केला जात आहे. याविषयी प्रत्यक्ष कोणतेही पत्र दिलेले नाही. मात्र अप्रत्यक्ष विरोध सुरुच आहे. दरम्यान मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्यापाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत व्यापाऱ्यांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान लासलगावची उप बाजार समिती विंचूर येथे आज कांदा लिलाव झाला. प्रति क्विंटल 4800 रुपये भाव मिळाला. या व्यतिरिक्त पूर्ण नाशिकच्या बाजारपेठेत कांदा लिलाव बंद आहे.
नवीन खरेदी करत नाहीत म्हणून कृत्रिम टंचाई निर्माण झाली होती. या दोन दिवसांत त्यांच्याकडील कांद्याचा साठा रिकामा करायचा आहे. म्हणजे, कृत्रिम टंचाइ दूर होईल. त्यानंतर बाजारातून नवीन कांदा खरेदी करायचा आहे. कांदा व्यापाऱ्यांनी अडीचशे क्विंटल साठवून ठेवला. आता या सर्व बाबींवर जिल्हाधिकारी आणि व्यापारी यांच्यात तोडगा काढण्यासाठी, शेतकऱ्यांचे नुकसान थांबवण्यासाठी शरद पवार नाशिक दौऱ्यावर आहेत.