कर्करोगाच्या ३९० औषधांच्या किमतीत ८७ टक्क्यांपर्यंत घट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/medicine-1.jpg)
‘एनपीपीए’च्या ४२ औषध घटकांच्या नियंत्रणाच्या निर्णयाचा परिणाम
कर्करोगाच्या ४२ औषध घटकांच्या किमतीवर राष्ट्रीय औषध नियंत्रण प्राधिकरणाने (एनपीपीए) ३० टक्क्यांपर्यंत नफा कमाविण्याचे र्निबध आणल्यानंतर ३९० औषधांच्या किमतीत घट झाली आहे. ही घट अगदी ३ टक्क्यांपासून ते अगदी ८७ टक्क्यांपर्यंत असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. ८ मार्चपासून नव्या दराने ही औषधे बाजारात विक्रीस उपलब्ध असणार आहेत.
औषधनिर्मिती केलेल्या कंपनीने घाऊक विक्रेत्यांना विकलेली किंमत आणि प्रत्यक्ष रुग्णाला द्यावी लागणारी किंमत यातील अमाप तफावत लक्षात घेऊन ‘ट्रेड मार्जिन रॅशनलाझेन’ पद्धतीने कर्करोगाच्या ४२ औषध घटकांच्या नफ्यावर मर्यादा आणल्याचे प्राधिकरणाने २७ फेब्रुवारीला अधिसूचनेद्वारे जाहीर केले. औषधनिर्मिती कंपन्यांना ३० टक्क्यांपर्यंत नफा मिळण्याची मुभा असल्याचे स्पष्ट करत असताना त्यानुसार कंपन्यांनी घाऊक विक्रेत्यांना आणि प्रत्यक्ष रुग्णांना विक्री करण्याच्या किमती आधीच ठरवाव्यात असे निर्देश प्राधिकरणाने दिले होते. या निर्देशाच्या अनुषंगाने कंपन्यांनी ३९० ब्रॅण्डच्या औषधांच्या किमतींमध्ये घट केल्याचे प्राधिकरणाला कळविले आहे. या सर्व औषधांच्या किमतीमध्ये झालेली घट आणि मूळ किंमत याचा तपशील प्राधिकरणाने शुक्रवारी जाहीर केला आहे.
यामध्ये १५० रुपयांपासून ते १ लाख रुपयांच्या किमतीच्या औषधांचा समावेश आहे. नियंत्रणानंतर यातील काही औषधांच्या किमतीमध्ये ८७ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे निदर्शनास येते. ३८ ब्रॅण्डच्या औषधांच्या किमती ७५ आणि त्याहूनही घट झाली आहे, तर १२४ ब्रॅण्डच्या औषधांमध्ये ५० ते ७५ टक्के घट झाल्याचे समोर येते. १२१ बॅ्रण्डच्या किमतीमध्ये २५ ते ५० टक्के आणि १०७ ब्रॅण्डच्या किमतीमध्ये २५ टक्क्यांहून कमी घट झाल्याचे यामध्ये म्हटले आहे.
‘सरकारी विमा योजनेतून उपचार मिळण्याची शक्यता’
एनपीपीएच्या या निर्णयामुळे खासगी रुग्णालयांमधील कर्करुग्णांना निश्चितच फायदा होईल. बऱ्याचदा खासगी रुग्णालये रुग्णांना रुग्णालयातील औषधे घेण्यासाठी भाग पाडतात आणि या औषधांची छापील किमतीनुसारच विक्री होते. औषधांच्या किमती कमी झाल्याने रुग्णांवरील हा खर्चाचा भार नक्कीच कमी होईल. याची दुसरी बाजू म्हणजे महात्मा फुले जीवनआरोग्य किंवा आयुष्मान योजनेंतर्गत असलेले कर्करोगाच्या उपचाराचे दर हे टाटा किंवा सरकारी रुग्णालयांच्या दरानुसार ठरविलेले असतात. परंतु औषधेच प्रचंड महाग असल्याने खासगी रुग्णालये या दरामध्ये उपचार करण्यास नकार देतात. आता औषधांच्या किमतीत घट झाल्याने खासगी रुग्णालयेही या दोन्ही योजनांचे दर स्वीकारून उपचार करण्यास पुढाकार घेण्याची अधिक शक्यता आहे, असे टाटा मेमोरियल रुग्णालयाचे बालरोग आणि वैद्यकीय ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. श्रीपाद बाणावली यांनी सांगितले.