कर्करोगाच्या रूग्णांवर मोफत केमोथेरपी उपचार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/health-chkup.jpg)
4 जिल्ह्यांत 1 जुलैपासून योजना राबविणार
मुंबई – कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराचा सामना करणा-या राज्यातील रूग्णांना आता केमोथेरपीचे मोफत उपचार मिळणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून येत्या जुलैपासून पहिल्या टप्प्यात चार जिल्ह्यात मोफत केमोथेरपी उपचाराची योजना सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्यभरातील कर्करोग रूग्णांना उपचारासाठी मुंबईत टाटा रूग्णालयात यावे लागते. रूग्णांना मुंबईत येण्याचा त्रास होऊ नये आणि त्यांना त्यांच्याच जिल्ह्यात केमोथेरपीचे उपचार मिळावेत म्हणून ही योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेमुळे रूग्णांना उपचारासाठी मुंबईत येण्याची गरज राहणार नाही. राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमानुसार देशात दरवर्षी जवळपास 11 लाख लोकांना कर्करोगाचा आजार जडतो. तर केवळ कर्करोगामुळे दरवर्षी पाच लाख लोकांना आपला प्रण गमवावा लागतो, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
या योजनेसाठी आरोग्य विभागाने आपल्या काही कर्मचा-यांना टाटा कर्करोग रूग्णालयातील तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण दिले आहे. त्यानुसार हे प्रशिक्षित कर्मचारी कर्करोग रूग्णांवर मोफत उपचार करतील. या योजनेसाठी साता-यासह पुणे, नागपूर, गडचिरोली, अमरावती, नाशिक, वर्धा, भंडारा आणि अकोला अशा नऊ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी चार जिल्ह्यात येत्या 4 जुलैपासून मोफत उपचाराची योजना सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.