कणकवलीत भाजपा- स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते भिडले
कणकवलीत भाजपाचे युवा नेते संदेश पारकर आणि नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने राजकीय वातावरण तापले. पारकर यांच्या घराबाहेर तोडफोड करण्यात आल्याने त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कणकवलीतील महाविद्यालयात बुधवारी दोन गटांमध्ये वाद झाला आणि या वादाने काही वेळातच राजकीय वळण घेतले. कणकवली महाविद्यालयाच्या मैदानात आधी राडा झाला. यानंतर नगराध्यक्ष समीर नलावडे आणि संदेश पारकर यांच्या गटापर्यंत हा वाद पोहोचला. दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. यात भर म्हणजे, पारकर यांच्या निवासस्थानाबाहेर पार्क केलेल्या दुचाकींची तोडफोड करण्यात आली. अखेर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. समीर नलावडे हे स्वाभिमान पक्षाचे नेते असून ते सध्या नगराध्यक्ष आहेत.
या राड्यानंतर नगराध्यक्ष समीर नलावडे, गटनेते संजय कामटतेकर, स्वाभिमान युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री व अन्य मंडळींनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी पारकरांच्या घरी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. या दोन्ही गटात नगरपंचायत निवडणुकीपासून वाद सुरु आहे. हा वाद बुधवारी पुन्हा एकदा उफाळून आल्याने कणकवलीतील वातावरण तणावपूर्ण आहे.