औरंगाबाद-मुंबई हवाई प्रवासात दोन ते तीन पटीने वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/flight-safe.jpg)
औरंगाबाद – चिकलठाणा विमानतळावर सायंकाळी येणारे जेट एअरवेजचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान ३१ मार्चपयंर्त रद्द करण्यात आले आहे. परिणामी प्रवाशांनी आपला मोर्चा अन्य विमान कंपन्यांकडे वळविला आहे. यामुळे या मार्गावरील भाडे तब्बल दोन-तीन पटींने महागले आहे. याचा परिणाम उन्हाळी सुट्टीमध्ये फिरायला जाणाऱ्या पर्यटकांवर होणार असून हवाई भाडे महागणार आहे.
सध्या परीक्षांचा हंगाम असून पुढील काळात सुट्या सुरू होणार आहे. यामुळे बरेच जण देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य देतात. दिल्लीकडे शिवाय अन्य राज्यात हवाईमार्गाने प्रवास करायचा झाला तर औरंगाबादेतून मुंबईकडे हवाई मार्गाने जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. यातच चिकलठाणा विमानतळावर सायंकाळी येणारे जेट एअरवेजचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान ३१ मार्चपर्यंत रद्द केले आहे.
मुंबई विमानतळाच्या धावपट्टीचे काम हाती घेण्यात आल्यानंतर धावपट्टी सकाळी ११ ते ५ वाजेदरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जेट एअरवेजने ७ ते ३१ मार्चपयंर्त सायंकाळचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यातच तीन दिवसांपूर्वी अचानक सायंकाळचे विमान सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारीदेखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ऑपरेशनच्या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याचा परिणाम मात्र प्रवाशांना सोसावा लागत आहे. अन्य कंपन्यांकडे ग्राहकांनी धाव घेतल्याने याच संधीचा फायदा घेत हवाई कंपन्यांनी भाड्यांमध्ये कमालीची वाढ केली आहे. ४ ते ७ हजारांदरम्यान असणारे विमान भाडे आता ७ ते १८ हजारांच्या घरात जाऊन बसले आहे. .