एकनाथ खडसे यांच्या आदेशानेच मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला- उदयसिंग पाडवी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Eknath-khadse-And-Udaysinh-padvi-ncp.png)
जळगाव –|भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षावर नाराज असुन ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा आहे. आता खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा सुरु असताना माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. खडसे यांच्या आदेशानेच मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे, असं सांगत राजकीय वर्तुळामध्ये त्यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.
राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार उदयसिंह पाडवी म्हणाले, “ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक एकनाथ खडसे यांच्या आदेशाने आणि सल्ल्याने मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला”. एकनाथ खडसेंनी देखील पाडवी यांच्या बोलण्याला दुजोरा दिला आहे. आपण त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास सुचवलं असल्याचं मान्य केले आहे. अनेक सहकारी आहेत, जे माझ्यावर विश्वास ठेवत पक्षांतर करतात, असं म्हणत खडसेंनी एकप्रकारे भाजपला इशाराच दिला आहे.
विधानसभा निवडणुकीचं तिकीट नाकारण्यापासून ते अगदी भाजपच्या राष्ट्रीय कार्याकारिणीत स्थान न मिळणे या साऱ्या प्रकाराने खडसे व्यथित झाले आहेत. त्यांनी त्यांची उद्विग्नता अनेक वेळा जाहीर सभांमधून आणि माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे. तसंच ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांचं खंडन देखील करत नाहीत. यावरून गेल्या काही दिवसांपासून त्यांची आणि राष्ट्रवादीची सलगी दिसून येत आहे.