एकजुटीनेच दहशतवादाचा बीमोड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/Stories-of-Strength-event.jpg)
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या कार्यक्रमात निर्धार
विनाशाला विनाशानेजिंकता येत नाही, तर मानवतेच्या एकजुटीतूनच दहशतवादाचा समर्थपणे बीमोड करता येईल, असा दृढविश्वास २६/११च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘इंडियन एक्स्प्रेस’ने ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सोमवारी व्यक्त करण्यात आला.
हा दहशतवादी हल्ला केवळ भारतावर झालेला नव्हता, तर तो मानवतेवरच करण्यात आला होता. त्याला समूह किंवा संघशक्तीनेच जिंकता येईल, हा निर्धार शहिदांच्या आठवणींनी अंगावर रोमांच उभ्या राहिलेल्या सर्वानीच या वेळी केला.
या दहशतवादी हल्ल्याला मुंबई पोलीस, एनएसजीचे कमांडो यांनी चोख प्रत्युत्तर दिले, धारातीर्थी पडले, सीएसएमटी व अन्य ठिकाणी काहींनी प्राण गमावला व जखमी झाले. त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी या आघातातून गेल्या १० वर्षांत कठीण प्रसंगांना तोंड देत स्वत:ला सावरले. त्यांच्या शौर्यगाथा ‘स्टोरीज ऑफ स्ट्रेंथ’ म्हणून ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केल्या. ‘पेंग्विन रॅण्डम हाऊस इंडिया’ने त्या ग्रंथरूपात प्रकाशित केल्या.
इंडियन एक्स्प्रेस समूह व फेसबुक यांनी शहिदांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या शौर्यगाथांना अभिवादन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रलयाला प्रलय हे उत्तर असू शकत नाही, एकता, एकात्मता व संघशक्तीनेच दहशतवादाचा यशस्वी सामना करता येईल, असा निर्धार व्यक्त केला. या निर्धाराला समर्पक जोड दिली, ती अंजली गुप्ता या मुलीने. तिचे वडील सीएसएमटी येथे या हल्ल्यात मरण पावले होते. अंजली व तिची लहान बहीण यांनी आईला साथ दिली आणि त्या जीवनसंघर्षांला आज तोंड देत आहेत. ‘कोशिश करनेवालों की कभी हार नही होती’ या काव्यपंक्ती तिने सादर केल्या अन् सारेच जण तिच्या निरागस चेहऱ्यावरील निर्धार पाहून अवा्क झाले.
या दहशतवादी हल्ल्यातून आम्ही बरेच काही शिकलो असून, सुरक्षा अधिक मजबूत केली आहे. आता अशाप्रकारे पुन्हा हल्ला होऊ शकणार नाही आणि तसा प्रयत्न झाल्यास समर्थपणे बीमोड केला जाईल, असा दृढविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही हाच निर्धार व्यक्त करीत नक्षलवादी शक्ती डोके वर काढत असल्याचाही उल्लेख केला.
फिरोज अब्बास खान यांच्या दिग्दर्शनातून साकारलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, राकेश चौरसिया, मर्लिन डिसूझा, राहुल देशपांडे, महेश काळे आदी सहभागी झाले होते. इंडियन एक्स्प्रेस समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांनी प्रास्ताविकात शहिदांच्या बलिदानाचा व शौर्यगाथांचा उल्लेख करून त्या प्रेरणादायी असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन मारुती सुझुकी, व्हाएकॉम १८ यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. एबीपी न्यूज, रिपब्लिक टीव्ही, कलर्स वाहिनी यांनीही कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले.