breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कार्यक्रमांची रेलचेल

  • साहित्य महामंडळाकडून कार्यक्रमपत्रिका जाहीर
  • उस्मानाबादमध्ये रंगणार साहित्याची नांदी

उस्मानाबाद | महाईन्यूज | प्रतिनिधी  

उस्मानाबाद येथे १० जानेवारीपासून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याची कार्यक्रमपत्रिका आज साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष नीतीन तावडे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर हे करणार असून समारोपात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कथा – कादंबरीकार प्राचार्य रा. रं. बोराडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. संमेलनात वाङ्मयीन व सामाजिक प्रश्नांवर पाच परिसंवाद, प्रतिभा रानडे यांची प्रकट मुलाखत, निमंत्रित कवींची दोन कविसंमेलने, कथाकथन, महात्मा ज्योतीराव फुले यांच्या शेतक-याचा असूड’ या ग्रंथावर अभ्यासकांची परिचर्चा तसेच आजच्या पाच लक्षवेधी कथाकारांशी अरविंद जगताप व राम जगताप यांचा प्रकट संवाद, बालसाहित्यिकांचा मुलांशी संवाद साधणारा ‘बालमेळावा’, बालाजी सुतार यांच्या गावकथा’ या नाटकाचा प्रयोग आणि दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम आखले आहेत.

याशिवाय ज्येष्ठ व श्रेष्ठ कथाकार भास्कर चंदनशिव, दिल्ली येथे चहा विकून चरितार्थ चालवणारे मूळ अमरावती जिल्ह्यातील मान्यवर मराठी भाषक हिंदी साहित्यिक लक्ष्मणराव (चहावाले) आणि श्रीरामपूरच्या ‘शब्दालय प्रकाशना’च्या प्रकाशक सुमती लांडे यांचा त्यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल संमेलनात जाहीर सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय मराठवाड्यातील कवींचे ‘आमचे कवी-आमची कविता’ असे एक स्वतंत्र कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.

संमेलनात रसिकांची बडदास्त

संमेलनस्थळी मांडवासमोर रसिक, वाचकांसाठी भव्य ग्रंथप्रदर्शन आयोजित केले असून पुस्तके खरेदी विक्रीची उत्तम सोय करण्यात आलेली आहे. प्रदर्शनाच्या मध्यभागी पुस्तक प्रकाशनाची खास विशेष सोय करण्यात आली आहे. संमेलनात कार्यक्रमांसाठी एक भव्य मंडप उभारण्यात आला असून त्यात सात हजार रसिकांची बसण्याची सोय केली जाणार आहे. याशिवाय आणखी  एक मध्यम आकाराचा आणि कविकट्ट्यासाठी एक लहान आकाराचा अशा दोन मंडपांतही एकाचवेळी तीन कार्यक्रमांची व्यवस्था करण्यात आली आहे.

स्वागताध्यक्षांचे मराठीप्रेमी रसिकांना आवाहन

निमंत्रितांची निवासाची व्यवस्था ‘हॉटेलां’मधून आणि ‘मंगल कार्यालयांतून करण्यात आलेली असून निमंत्रित लेखिका व स्त्री प्रतिनिधी यांच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. भोजन आणि नास्ता पाहुण्यांना संमेलनस्थळीच मिळेल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. संमेलनस्थळाला संत गोरोबा काका नगरी असे नाव देण्यात आले असून कार्यक्रमांसाठी उभारलेल्या मंडपांना उस्मानाबाद जिल्ह्यातील सुपुत्र शाहीर अमरशेख, देविसिंग चौहान आणि दत्तो आप्पाजी तुळजापूरकर अशी नावे देण्यात आलेली आहेत. तरी, रसिकांनी संमेलनाला येण्याचे व कार्यक्रमांचा व पुस्तके खरेदीचा आनंद घेण्याचे आवाहन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष नीतीन तावडे यांनी मराठीप्रेमी व वाङ्मयप्रेमी रसिकांना केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button