उद्यापासून राज्यात हुडहुडी! उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रवाहामुळे थंडी वाढणार
![In the next three to four days, the cold in the state including Mumbai will increase further](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/thandi.jpg)
मुंबई – हिवाळ्याला सुरुवात झाल्यापासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे ढगाळ वातावरणात राज्यात थंडी जाणवली नाही. मात्र, उद्यापासून उत्तर भारतात थंडीचा तडाखा वाढणार आहे. हा थंडीचा तडाखा महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोमवारपासून राज्यात कडाक्याची थंडी पडणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलीय. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढणार आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात गारवा वाढला आहे. 24 तासात तापमानात 1.2 अंश सेल्सिअसनं कमी झालं आहे. अशात आता पुढचे काही दिवस थंडी आणखी वाढेन असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सोबतच कोरोनाचा धोका टाळण्यासाठी नियमांचेही पालन करावे अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या कोरडं हवामान आहे. पुढचे पाच दिवस हवामान असंच राहणार असून तापमानात आणखी घट होईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. या आठवड्यातही बऱ्यापैकी थंडी पाहायला मिळाली. पण आता पुढच्या आठवड्यात थंडीचा तडाखा वाढणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, आता उत्तरेकडून राज्यात थंड वाऱ्याचा प्रवाह वाहू लागला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत चांगलाच गारठा वाढल्याचं पाहायला मिळतं. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत घट होऊ लागली आहे. या कोरड्या वातावरणामुळे नववर्षाच्या सुरुवातीला राज्यात चांगलीच थंडी पाहायला मिळणार आहे.
वाढत्या थंडीमुळे विदर्भामध्ये काही भागांत किमान तापमानात घट होत आहे. तर यामुळे त्यामुळे गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, अकोला भागांत थंडी वाढली आहे. पुढच्या आठवड्यात मात्र ही थंडी आणखी वाढणार आहे. मुंबईतही सोमवारपासून तापमान आणखी घसरण्यास सुरुवात होईल. यामुळे मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेता येणार आहे.