उद्धव यांच्या आक्रमकतेमुळे भाजप सावध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Uddhav-Thackeray-1-2.jpg)
२०१४चा वचपा काढण्याची चिंता
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भाजप सरकारवरील टीका तिखट होऊ लागल्याने, शिवसेना युती करेल याबाबत निर्धास्त असलेला भाजप थोडा सावध झाला असून २०१४ मधील विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने युती तोडल्याचा वचपा काढण्याची चिंता वाटू लागली आहे.
उद्धव ठाकरे हे सरकारच्या कारभारातील त्रुटींवर सातत्याने टीका करत आहेत. पण आतापर्यंत ही टीका सकारात्मक असल्याचे भाजप नेते बोलत होते. तसेच शिवसेनेने कितीही टीका केली तरी हिंदुत्व व राम मंदिराच्या मुद्दय़ावर युती होईल, असा विश्वास व्यक्त करत होते. पण तीन राज्यांतील पराभवानंतर राजकीय परिस्थिती बदलली आहे. भाजपचे वर्चस्व कमी झाले असून शिवसेनाही अधिक आक्रमक झाली.
पंढरपुरातील सभेत उद्धव ठाकरे यांनी नेहमीपेक्षा तिखट शब्दांत मोदी सरकारवर हल्ला चढवला. पहारेकरी चोर आहे, हे उद्धव यांचे मोदी यांना उद्देशून केलेले विधान वाक्य राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळणारे आणि टीकेतील एक सभ्यता सोडणारे असल्याचे भाजपमधील नेत्यांचे मत झाले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या परिस्थितीत शिवसेना आक्रमक होणे अपेक्षितच होते. पण ठाकरे यांची टीका ही खूपच विखारी होत आहे. जानेवारीमध्ये ते दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. त्यावरून त्यांनी राज्य सरकारवरही शरसंधान केले आहे. त्यातूनच मुख्यमंत्र्यांनी खासदार-आमदारांच्या बैठकीत स्वबळाचीही तयारी ठेवा, असा संदेश दिल्याकडे लक्ष वेधले जात आहे.