आशियायी स्पर्धेत भारतीय सैन्यदलाची नेत्रदीपक कामगिरी ;
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/20180828_114143.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज) – जकार्ता येथील 18 व्या आशियायी स्पर्धेत भारतीय सैन्यदलाने नेत्रदीपक कामगिरी केली. दापोडी येथील इंडियन रोइंग नोडच्या खेळाडूंनी क्वार्टर पूल स्कल स्पर्धेत सुवर्ण, लाईट वेट सिंगल स्कलमध्ये कांस्य आणि डबल स्कल या स्पर्धेतही कांस्य पदक मिळविले.
इंडोनेशियातील जकार्ता येथे 18 वी आशियायी स्पर्धा 23 व 24 आॅगस्ट 2018 रोजी पार पडल्या. यातील क्वार्टर पूल स्कल स्पर्धेत सुखमीत सिंग, सुभेदार सवर्ण सिंग, हवालदार ओम प्रकाश आणि दत्तू भोकनल या चौघांनी एकत्रित कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. लाईट वेट सिंगल स्कल या प्रकारात नायब सुभेदार दुष्यंत चौहान यांनी कांस्य तर रोहित कुमार आणि भगवान सिंग यांनी देखील कांस्य पदक मिळविले.
या पदकांमुळे भारतीय सैन्य दलाची मान उंचावली असून यापुढेही चांगली कामगिरी करण्याचे ध्येय सर्व खेळाडूंनी ठेवले आहे. राजेश कुमार यादव, इस्माईल बेग आणि साजिद थोमस यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. भारतातून 30 जणांचा संघ जकार्ता येथे झालेल्या आशियायी स्पर्धेत रोइंग स्पर्धेसाठी सहभागी झाला होता. त्यामध्ये 22 खेळाडू सैन्य दल (पुरुष), सात खेळाडू सैन्य दल (महिला) आणि एक सिव्हिल खेळाडू असे सहभागी झाले होते.
प्रशिक्षक राजेश कुमार यादव म्हणाले, पहिल्या दिवशीच्या पराभवामुळे बहुतांश खेळाडूंचे मानसिक आणि शारीरिक खच्चीकरण झाले होते. त्यांचे मनोधैर्य वाढवून दुस-या दिवशीच्या खेळासाठी त्यांना तयार करणे ही प्रशिक्षक म्हणून मोठी जबाबदारी होती. पहिल्या दिवशी दत्तू आणि सवर्ण या दोन खेळाडूंना मोठी इजा झाल्याने चांगल्या आणि अनुभवी खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला होता. दुस-या दिवशीच्या सामन्यांसाठी तयार केले. खेळाडूंनी चांगली कामगिरी करून तीन प्रकारांमध्ये तीन पदके मिळविली.
सुवर्ण पदक विजेते खेळाडू दत्तू भोकनल म्हणाले, “भारतातून इंडोनेशियाकडे जातानाच मी आजारी होतो. त्यात प्रवासाची दगदग आणि हवामानाचा विपरीत परिणाम यामुळे जास्तच आजार वाढला. पण त्यातूनही स्पर्धेसाठी सज्ज झालो. मी सहसा 80 किलोच्या पुढे वजन ठेवतो. मात्र लाईट वेट सिंगल स्कल स्पर्धेसाठी 72 किलोपर्यंत वजन कमी केले. पहिल्या दिवशी माझी स्पर्धा होती. स्पर्धा सुरु असताना माझी बोट अचानक उलटली आणि मी पाण्यात पडलो. बोटीमध्ये पाय अडकल्याने बाहेर येत येईना, या सर्व प्रकारामुळे सिंगल स्कल स्पर्धेत पराभव स्वीकारावा लागला. परंतु दुस-या दिवशी पुन्हा क्वार्टर पूल स्कल स्पर्धा असल्याने त्यासाठी सज्ज व्हायचे होते. दुस-या दिवशीच्या स्पर्धेसाठी एक खेळाडू नवीन होता, त्यामुळे आणखी कसब दाखवावे लागणार होते. प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले आणि मनातून खच्चीकरणाची भावना काढून टाकली. त्यामुळे दुस-या दिवशी सुवर्ण पदक मिळवू शकलो, असेही दत्तू यांनी सांगितले.