आईची हत्या करुन मुलाची आत्महत्या, घरात आढळले मृतदेह; लॅपटॉपमध्ये सापडली सुसाईड नोट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Mira-Road.jpg)
मीरा रोड येथे घरात आई आणि मुलाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना मुलाच्या लॅपटॉपमध्ये एक सुसाईड नोट सापडली आहे. सुसाईड नोट पाहता प्रथम मुलाने आईची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली असावी असा अंदाज असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोघांची ओळख पटली आहे. पीडितांची नावं वैंकटेश्वरन गोपाल अय्यर (४२) आणि मिनाक्षी अय्यर (७५) अशी आहेत.
शेजाऱ्यांनी घरातून दुर्गंध येत असल्याची तक्रार केल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. ‘आम्हाला शेजाऱ्यांनी फोन करुन अय्यर यांच्या फ्लॅटमधून दुर्गंध येत असल्याची माहिती दिली होती. आम्ही तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असता आई आणि मुलाचा मृतदेह सापडला’, अशी माहिती पोलीस अधिकारी शेखर डोंबे यांनी दिली आहे.
मिनाक्षी अय्यर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तर वैंकटेश्वरन यांच्या शरिरावर जखमेची कोणताही खूण नव्हती. पोलिसांना घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करावा लागला. यावेळी शेजारी तिथेच उपस्थित होते. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा आणि आई गेल्या चार ते पाच दिवसांपासून घराबाहेर दिसलेच नाहीत.
अय्यर २०१७ मध्ये मुंबईत येऊन स्थायिक झाले होते. मिरा रोड येथील मेरीगोल्ड अपार्टमेंटमध्ये भाड्याने घर घेऊन ते राहत होते. एप्रिलमध्ये त्यांना घर खाली करायचं होतं. पण घरमालकाकडून त्यांनी एप्रिल महिन्यापर्यंत मुदतवाढ मिळवून घेतली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.