breaking-newsमहाराष्ट्र

‘अवनी’बाबत आंतरराष्ट्रीय चौकशी करा!

  • वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मेनका गांधी यांना आव्हान

मुंबई – यवतमाळ जिल्ह्य़ातील पांढरकवडा येथे  टी-१ ‘अवनी’ या नरभक्षक वाघिणीला ठार केल्यानंतर केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी केलेल्या टीकेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले आहे. मेनका गांधी यांनी केवळ समाजमाध्यमातून आरोप करण्यापेक्षा या घटनेची राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरून चौकशी करावी, असे थेट आव्हान मुनगंटीवार यांनी मेनका गांधी यांना दिले आहे. त्यामुळे या वाघिणीच्या मृत्यूवरून सुरू झालेले आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण आणखी पेटण्याची शक्यता आहे.

‘‘अवनी या वाघिणीने गेल्या अडीच वर्षांत पांढरकवडा-राळेगाव आणि मारेगाव या तालुक्यात धुमाकूळ घालत १० जणांचा बळी घेतला होता. देशात आजवर व्याघ्र संरक्षणासाठी आपल्या राज्याने सर्वाधिक काम केले असून त्यामुळे वाघांची संख्याही वाढली आहे. मात्र आज अज्ञानापोटी काही प्रश्न उपस्थित केले जात असून, समाजमाध्यमातून हीन पातळीवरील टीका केली जात आहे. त्यामुळे वनाधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे’’, असे मुनगंटीवार म्हणाले. या वाघिणीस मारताना सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

या वाघिणीला जेरबंद करण्याचे सर्व प्रयत्न फसल्यानंतर मुख्य वनसंरक्षक यांनी या वाघिणीस जेरबंद करणे शक्य न झाल्यास ठार मारण्याचे तसेच तिच्या दोन बछडय़ांना जेरबंद करून पुनर्वसन केंद्रात पाठविण्याचे आदेश दिले होते. त्याला उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देण्यात आले. मात्र दोन्ही न्यायालयांनी वन विभागाचा निर्णय कायम करीत वन विभागाच्या प्रयत्नांचे कौतुकही केले होते, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

पांढरकवडा भागात ही वाघीण दिसली तेव्हा तिला जेरबंद करण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो फसला आणि वाघिणीनेच गाडीवर हल्ला केला. तेव्हा वन विभागाच्या पथकाने स्वसंरक्षणार्थ अवनीला मारले. यामुळे आपण वाघांना मारण्याचे आदेश दिल्याचा केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी केलेला आरोप बिनबुडाचा असून आपल्या काळात केवळ टी-१ वाघिणीला मारण्याचेच आदेश झाले, तेही आपण दिले नसून मुख्य वनसंरक्षकांनी दिले आहेत़, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. उलट गांधी यांच्या मतदारसंघातच सन २००९ मध्ये एका नरभक्षक वाघास मारण्यात आले तेव्हा तेथील सरकारने या वाघास मारणाऱ्या शहाफत अली खान यांचे अभिनंदन केले होते. तसेच सध्या आठ राज्यांमध्ये शहाफत खान आणि त्यांच्या मुलाची शार्प शूटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आमच्यावर आरोप करणाऱ्या गांधी यांनी कोणत्याही यंत्रणेकडून चौकशी करावी, त्यास आमची तयारी आहे, असे आव्हानही मुनगंटीवार यांनी या वेळी दिले. मेनका गांधी यांनी आपल्यावर आणि वन विभागावर बिनबुडाचे आरोप करण्यापूर्वी ५० पैसे खर्च करून मला एक फोन केला असता तर बरे झाले असते. त्यांना सर्व माहिती दिली असती; त्यांनी जे वक्तव्य केले त्यामुळे वनविभागाच्या चांगल्या कामाला नजर लागल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

प्रक्रिया तपासणार : मुख्यमंत्री

वाघिणीला मारण्याच्या घटनेचे सर्वानाच दु:ख असून या घटनेबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी केलेले वक्तव्य कडवट असले तरी त्या प्राणिरक्षणासाठी झटणाऱ्या असल्याने त्यांच्या भावना समजून घ्या, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या वाघिणीला मारण्याची प्रक्रिया वन विभागाने व्यवस्थित पार पाडली आहे का, हे तपासून पाहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button