अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आंबेकरला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Santosh-Ambekar.jpg)
नागपूर | कुख्यात गुंड संतोष आंबेकरला नवे वर्षही पोलीस कोठडीत काढावे लागणार आहे. गुन्हे शाखेने त्याला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटक करून ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी घेतली आहे.
बंदुकीच्या धाकावर १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे शोषण करण्याच्या आरोपाखाली संतोष आंबेकर आणि कॉपर सलूनचा संचालक विवेक सिंह यांच्याविरुद्ध पोक्सो तसेच धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला आहे. ९ डिसेंबरला विवेक सिंहला अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्याने आंबेकरला अल्पवयीन विद्यार्थिनी उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. मागील आठवड्यात विवेकची जमानत याचिका न्यायालयाने खारीज केली. त्यानंतर आंबेकरला अटक करण्यात येणार होती. गुन्हे शाखेने न्यायालयातून प्रॉडक्शन वॉरंट मिळवून सहायक पोलीस निरीक्षक प्रीती कुळमेथे यांनी आज आंबेकरला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांना विवेक सिंह याच्या मोबाईलमधून १६० ध्वनी चित्रफिती मिळाल्या आहेत. त्यात विवेक आणि आंबेकरने अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा खुलासा झाला आहे. या प्रकरणाचा बारकाईने तपास केल्यास अत्याचाराच्या अनेक प्रकरणांचा खुलासा होऊ शकतो. ध्वनी चित्रफितीत विवेक ज्या विद्यार्थिनींबाबत आंबेकरशी चर्चा करीत आहे त्यांचा खुलासा झालेला नाही. बदनामी आणि सामाजिक प्रतिष्ठेमुळे विद्यार्थिनी समोर येण्यास धजावत नाहीत. पीडित विद्यार्थिनींची पोलिसांच्या कारवाईनंतर हिंमत वाढल्यामुळे सहा महिन्यानंतर तक्रार दाखल केली होती. त्यामुळे हे प्रकरण उजेडात आले होते. आंबेकरविरुद्ध आतापर्यंत अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.