अरमान कोहलीला हायकोर्टाचा दिलासा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Mumbai-High-Court-2.jpg)
- कारागृहातून सुटका, गर्लफ्रेंडला मारहाणीचा गुन्हाही रद्द
मुंबई – गर्लफ्रेंडला मारहाणप्रकरणी अटकेत असलेल्या अभिनेता अरमान कोहलीला उच्च न्यायालयाने आज दिलासा दिला. अरमानने यापुढे असे कृत्य घडणार नसल्याची लेखी हमी दिल्याने न्यायालयाने नीरु रंधावा हिला तडजोडीनुसार रक्कम देण्याचे आदेश देत गुन्हा रद्द करून त्याची कारागृहातून सुटका करण्याचे आदेश दिले.
गर्लफ्रेंड नीरू रंधावाला मारहाण केल्याबद्दल अभिनेता अरमान कोहलीला लोणावळ्याहून अटक करण्यात आल्यानंतर वांद्रे न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी करताना जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर त्याच्यावतीने ज्येष्ठ वकील ऍड. सतीश माने-शिंदे यांनी उच्च न्यायालयात जामीनाबरोबरच गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
न्यायालयाने काल अरमानला अशा प्रकारचे कृत पुन्हा घडणार नाही, अशी लेखी हमी देण्याबरोबरच नीरू रंधावाबरोबर तडजोड करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार अरमानने लेखी हमी न्यायालयात सादर केली.तर नीरु रंधावा हिने अरमान कोहलीच्या कुटूंबियांशी तडजोड झाल्याने आपण तक्रार मागे घेत असल्याचे न्यायालयात सांगितले. याची दखल न्यायालयाने घेतली.
न्यायालयाने अरमानला समाजसेवा म्हणून हायकोर्टाने अरमान कोहलीला 1 लाख रूपये टाटा मेमोरियलच्या लहान मुलांसाठीच्या शाखेला आणि 1 लाख रूपये नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंडला देणगी म्हणून देण्याचे आदेश देताना त्याच्यावरील गुन्हा रद्द करून तातडीने सुटका करण्याचे निर्देश कारागृह प्रशासनाला दिले.