अधिवेशनाचा आज शेवट ; ‘मोठी घोषणा होण्याची शक्यता’, अजित पवार यांचे संकेत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/ajit-pawar_20170916314-1.jpg)
नागपूर | महाईन्यूज
आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आज शेतक-यांबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. असे संकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिले आहेत. शेतक-यांचे हित साध्य करण्याबाबत हे सरकार सकारात्मक आहे. आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी चांगला निर्णय ऐकायला मिळेल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात हजेरी लावण्यापूर्वी अजित पवारांना पत्रकारांनी विविध प्रश्न विचारले. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय, हेक्टरी 25 हजाराची घोषणा होऊ शकते का, असे प्रश्न अजित पवार यांना विचारले. त्यावर पवार म्हणाले की, मी शासनाचा घटक नाही. मी मंत्रीही नाही. मात्र, सरकार स्थापन करण्यासाठी आमच्या पक्षाने पुढाकार घेतला आहे. आम्ही पहिल्यापासूनच शेतकऱ्यांबाबत सकारात्मक आहोत. त्यामुळे ज्या गोष्टी सभागृहात बोलायच्या असतात, त्या बाहेर बोलणं योग्य होणार नाही. मला वाटतं शेतकऱ्यांबाबत आज चांगला निर्णय होईल, असं माझं मन मला सांगतंय, असे पवार यांनी सांगितले.
अधिवेशनातून काहीतरी घोषणा होण्याची परंपरा कायम आहे. त्यामुळे सर्वाचं लक्ष आजच्या शेवटच्या दिवशी होणा-या सभेकडे लागले आहे. लोकांचं लक्ष असतं, पॅकेज काय मिळतं. त्यामुळे उद्धवजी प्रमुख असल्यामुळे ते सकारात्मक निर्णय घेतील. सकारात्मक ऐकायला मिळेल, असं पवार म्हणाले.