अंधेरी पूल दुर्घटनेतील जखमी अस्मिता काटकर यांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/asmita-katkar-andheri-bridg.jpg)
मुंबई : अंधेरीतील गोखले पूल दुर्घटनेतील जखमी अस्मिता काटकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांची प्रकृती अधिकच ढासळल्याने त्या कोमामध्ये गेल्या होत्या. अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. कूपर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रेल्वेकडून अस्मिता काटकर यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. शिवाय रुग्णालयाचा सर्व खर्चही रेल्वेकडून भरण्यात येणार आहे.
नेहमीप्रमाणे अस्मिता यांनी आपल्या सहा वर्षीय मुलाला अंधेरी पूर्वेकडील परांजपे विद्यालयात सोडलं आणि आपल्या कामासाठी गोखले पुलावरुन जुहूच्या दिशेने त्या पायी जात होत्या. काही समजण्याच्या आतच गोखले पुलाचा पादचारी भाग कोसळला आणि त्या ढिगाऱ्याखाली अडकल्या गेल्या. यानंतर तातडीने त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून अस्मिता काटकर यांची मृत्यूशी झुंज सुरू होती.
अस्मिता यांना या दुर्घटनेत मोठी जखम झाली होती. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पुलाचा पादचारी भाग 3 जुलै रोजी सकाळी साडे सात वाजता अचानक कोसळला. यामुळे दिवसभर पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. तर या घटनेत पाच जण जखमी झाले होते.