एअर स्ट्राईकचा सूड घेऊच; अफगाणिस्तानचा पाकिस्तानला थेट इशारा

Pakistan Attack On Afghanistan | अफगाणिस्तानच्या तालिबान प्रशासनाने पाकिस्तानला थेट इशारा देत एअर स्ट्राईकचा सूड नक्की घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. या इशाऱ्यानंतर अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमावाद पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानवर गंभीर आरोप करत निष्पाप नागरिकांवर भ्याड हल्ला केल्याचा दावा केला. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याचा बदला घेतला जाईल, असे त्यांनी ठामपणे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या अफगाणिस्तानातील काही प्रांतांमध्ये पाकिस्तानी लष्कराने रविवारी हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये महिला आणि मुलांसह डझनभर नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा अफगाण अधिकाऱ्यांनी केला आहे. एका कुटुंबातील तब्बल १७ जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : सौर कृषी वाहिनी योजनेत १० हजार कोटींचा ‘महाघोटाळा’; दानवेंचा सरकारवर गंभीर आरोप
पाकिस्तानच्या सैन्याने पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये घुसखोरी करत एअर स्ट्राईक केला. रविवारी रात्री नांगरहार आणि पक्तिका प्रांतात निरपराध नागरिकांवर बॉम्ब हल्ला केला. यामध्ये महिला, लहान मुलांसह डझनभराहून अधिक लोक मारले गेले. हे सगळे एकाच कुटुंबातले असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. पाकिस्तानचं हे कृत्य निषेधार्ह आहे आम्ही याचा बदला नक्की घेऊ. पाकिस्तानने हवाई सीमेचं उल्लंघन केलं आहे त्यामुळे अफगाणिस्तानला उत्तरादाखल कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे. योग्य वेळ आली की आम्ही पाकिस्तानला उत्तर देणारच, असं मुजाहिद यांनी म्हटलं आहे.




