Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

पश्चिम आशियात पुन्हा युद्धाचा भडका! अमेरिकेचा इराणवर जोरदार हल्ला; ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ बंद

US attacks Iran | अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शांतता कराराच्या चर्चेला मोठा खिळा बसला असून, पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्धाचा तीव्र भडका उडाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या कडक इशाऱ्यानंतर अमेरिकन लष्कराने इराणच्या हद्दीत घुसून सलग दुसऱ्या दिवशी भीषण हवाई हल्ले चढवले आहेत. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनेही थेट अमेरिकन सैन्याच्या तळांना लक्ष्य केले असून जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ सर्व प्रकारच्या जहाजांसाठी तात्काळ बंद केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.

अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी इराणमधील अनेक लष्करी लक्ष्यांवर हे ‘स्व-संरक्षणात्मक’ हल्ले केले आहेत. इराणच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या या हल्ल्यांमुळे पश्चिम तेहरान, फार्स प्रांत, बंदर अब्बास, केशम बेट, किश, मीनाब आणि मध्य इस्फहानमधील अनेक भागांमध्ये भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले. या हल्ल्यानंतर इराणने आपल्या दक्षिण भागांमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा (Air Defence System) हाय अलर्टवर सक्रिय केली आहे.

करार करा, नाहीतर हल्ले सुरूच राहतील: डोनाल्ड ट्रम्प

व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमधून पत्रकारांशी बोलताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या या कारवाईचे समर्थन केले. ट्रम्प म्हणाले, “आम्ही कालही त्यांच्यावर जोरदार हल्ला केला आणि आजही आम्ही पुन्हा एकदा तीव्र हल्ले करू. इराणला जर हा तणाव टाळायचा असेल, तर त्यांनी तातडीने शांतता करार करावा.”

ट्रम्प यांनी पुढे माहिती दिली की, इराणच्या हद्दीतील लष्करी तळांचा थरकाप उडवण्यासाठी अमेरिकेने तब्बल ४९ टॉमहॉक (Tomahawk) क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे. यातील काही लक्ष्ये इराणची राजधानी तेहरानपासून अवघ्या ६४ किलोमीटर अंतरावर होती. अमेरिकेची लढाऊ विमाने थेट इराणच्या हवाई हद्दीत कार्यरत असून, इराणचा नैऋत्य भाग आणि पर्शियन आखातातील त्यांच्या रडार व हवाई संरक्षण यंत्रणा निकामी केल्या जात असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.

हेही वाचा

‘कल्याण येथील बुद्धभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण’;मंत्री संजय शिरसाट

इराणचा प्रतिहल्ला; अमेरिकेचे १८ लष्करी तळ लक्ष्य

अमेरिकेच्या या आक्रमक कारवाईला इराणनेही तितक्याच तीव्रतेने प्रत्युत्तर दिले आहे. इराणच्या ‘तसनीम’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’च्या (IRGC) हवाई आणि नौदलाने अमेरिकन सैन्यावर दोन टप्प्यांत प्रतिहल्ला चढवला. या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये अमेरिकन सैन्य तैनात असलेल्या तळांवरील १८ प्रमुख लष्करी आस्थापनांना इराणने यशस्वीपणे लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी बंद

या ताज्या संघर्षामुळे इराणच्या किनारी प्रदेशात प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय तेल टँकर आणि व्यापारी जहाजांची वाहतूक रोखण्यासाठी इराणने ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ तात्काळ प्रभावाने बंद करण्याची घोषणा केली आहे.

यावर इशारा देताना इराणच्या आयआरजीसी एअरोस्पेस फोर्सचे कमांडर ब्रिगेडियर जनरल माजिद मोसवी म्हणाले, “जर तुम्ही पवित्र होर्मुझ सामुद्रधुनीला असुरक्षित करण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्यासाठी (अमेरिकेसाठी) आम्ही हा संपूर्ण प्रदेश नरकासमान करू.”

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधल्याचा दावा केला होता. मात्र, ट्रम्प यांचा हा दावा पूर्णपणे खोटा असून असे कोणतेही संभाषण झाले नसल्याचे इराणी माध्यमांनी स्पष्ट केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button