पश्चिम आशियात युद्ध पेटले! जॉर्डनमधील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेचे इराणवर भीषण हवाई हल्ले

US airstrikes on Iran intensive retaliatory | पश्चिम आशियामध्ये (Middle East) युद्धाची परिस्थिती अधिकच चिघळली आहे. जॉर्डनमध्ये इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यापासून संरक्षण करताना अमेरिकेचे दोन सैनिक मारले गेले होते. या हल्ल्याचा तीव्र बदला घेण्यासाठी अमेरिकेने रविवारी पहाटे इराणच्या विविध भागांवर भीषण हवाई हल्ले केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या थेट आदेशानंतर ही लष्करी कारवाई करण्यात आली असून, यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष अत्यंत गंभीर वळणावर पोहोचला आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी जॉर्डनमध्ये झालेल्या इराणी हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. तसेच एक सैनिक अद्याप बेपत्ता आहे.
या कारवाईबाबत CENTCOM ने स्पष्ट केले की, “हे हवाई हल्ले होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जागतिक व्यावसायिक जहाजांना धोका निर्माण करण्याची इराणची क्षमता कमकुवत करण्यासाठी करण्यात आले आहेत. तसेच जॉर्डनमध्ये अमेरिकन सैनिकांवर हल्ला करणाऱ्या इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) च्या दलांना तातडीने शिक्षा देण्याच्या उद्देशाने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.”
इराणच्या विविध तळांवर अमेरिकेचा मारा
इराणच्या मेहर न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणच्या दक्षिण किनारपट्टीवरील सिरीक शहराजवळील भागांना लक्ष्य केले. याशिवाय हाजीआबाद आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या केशम बेटावरही अमेरिकेने हल्ले चढवले आहेत. होर्मोजगानच्या राज्यपालांनी या हल्ल्यांना दुजोरा दिला असून, प्राथमिक माहितीनुसार यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
हेही वाचा
७२ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर! ‘Article 370’ सर्वोत्कृष्ट चित्रपट
अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी या कारवाईनंतर आक्रमक भूमिका घेतली आहे. “जॉर्डनमध्ये इराणी हल्ल्यात आमच्या दोन सैनिकांचा झालेला मृत्यू वॉशिंग्टनचा निर्धार अधिक मजबूत करेल. अमेरिकन सैनिकांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत,” असा इशारा त्यांनी दिला.
संघर्ष तीव्र होण्याचा इराणचा इशारा; ट्रम्प यांच्यावर टीका
दुसरीकडे, अमेरिकेच्या या हल्ल्यांनंतर इराणनेही युद्धाची भाषा सुरू केली आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी यांनी शनिवारीच चेतावणी दिली होती की, “वॉशिंग्टनला इराण आणि त्याच्या मित्रराष्ट्रांकडून कधीही न विसरता येणारे धडे मिळतील.” खामेनी यांनी एका लेखी निवेदनात अमेरिकेवर दोन्ही देशांमधील सामंजस्य करारांचे वारंवार उल्लंघन केल्याचा आरोप केला. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी “पूर्णपणे निरुपयोगी आणि विश्वासार्हता नसलेली” असल्याचे म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात उभय देशांमधील युद्धबंदी संपुष्टात आली होती. त्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर थेट हल्ले सुरू केल्यामुळे हा संघर्ष आता केवळ दोन देशांपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण प्रादेशिक युद्धाचे रूप धारण करेल, अशी भीती जागतिक स्तरावर व्यक्त केली जात आहे.





