breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस; घरांमध्ये घुसले पाणी

परभणी |

जिल्ह्यत गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस झाला असून अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. शहरातही पावसाने दाणादाण केली असून अनेक वस्त्यांमध्ये घरात पाणी घुसल्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. परभणी-गंगाखेड या सर्वाधिक रहदारीच्या रस्त्यावरील पुलाचे काम चालले असल्याने या ठिकाणी करण्यात आलेला पर्यायी रस्ता वाहून गेला. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बराच काळ ठप्प होती तर पिंगळगड नाल्याचे पाणी लगतच्या अनेक वस्त्यांमध्ये घुसल्याने काही कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी (दि.१२) व रविवारी (दि.१३) जिल्ह्यत जोरदार पाऊस झाला विशेषत: शनिवारच्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली. अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून काही ठिकाणी वाहते पाणी शेतात घुसल्याने जमिनी खरवडून गेल्या आहेत. शनिवारच्या पावसाने जिल्ह्यत अनेक ठिकाणी ओढे व नदी नाल्यांना पूर आले.

रविवारी दुसऱ्या दिवशी सुद्धा रात्री साडेनऊ वाजता जोरदार पावसाचे आगमन झाले. हा पाऊस जिल्ह्यत सर्वदूर होता. परभणी शहरात या पावसाने अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले. शहरातील मंत्रीनगर, बाबर कॉलनी या भागात अनेक घरांमध्ये पाणी साचल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. विशेषत: शहरालगत असलेल्या वस्त्यांना या पावसाचा मोठा फटका बसला. जुना पेडगाव रोड परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले. महानगरपालिकेने सर्वच भागात पावसाळापूर्व साफसफाईची कामे न केल्याने हा प्रकार उद्भवला. पावसामुळे शनिवारी व रविवारी वीज पुरवठा रात्री पाच—सहा तास खंडित झाला. शहरातल्या काही भागात तर संपूर्ण रात्रभर वीज आलीच नाही. सध्याही जिल्ह्यतल्या काही गावांमध्ये वीज पुरवठा नसल्याने या गावांना रात्र अंधारात काढावी लागली आहे. गेल्या चोवीस तासांत परभणी जिल्ह्यत १९.१ मिमी. पाऊस झाला. आतापर्यंत जिल्ह्यत १६१ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यत सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक १९८ मीमी. पाऊस झाला असून गंगाखेड तालुक्यात १२६ मीमी पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर जास्त असून झालेला पाऊसही आतापर्यंत पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा जास्त आहे. गेल्या दोन दिवसात अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहिले. परभणी-गंगाखेड या रस्त्यावरील वाहतूक या पावसाने ठप्प केली. जिल्ह्यतल्या अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने मातीचा थर वाहून गेल्यामुळे जमिनी खरवडून गेल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button