अक्कलकोट मध्ये खून खटल्यात पतीसह तिघांना जन्मठेप
![धक्कादायक! २७ दिवसांच्या बाळाचा भिंतीवर डोकं आपटून खून; सख्ख्या आईनेच ‘या’ कारणामुळे केलं कृत्य](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/murder-1.jpg)
सोलापूर |
अक्कलकोट येथे पत्नीची आई, शेजारची महिला आणि रिक्षाचालकाच्या मदतीने निर्घृणपणे खून करून मृतदेह रेल्वे रुळावर टाकून गुन्ह्यचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पतीसह त्याची आई आणि शेजारच्या महिलेला सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर रिक्षाचालकाला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. अक्कलकोट येथे संजयनगर झोपडपट्टीत राहणारा रमजान मन्नू शेख (वय २२), त्याची आई अम्मा ऊर्फ रेणुका मन्नू शेख (वय ५०) आणि शेजारी राहणारी शाहीन रहिमान शेख (वय ३५) या तिघांना जन्मठेप तर रिक्षाचालक दिलावर तकदीरखाँ सौदागर (वय ३०) यास पाच वर्षे सक्तमजुरी सुनावण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी हा निकाल दिला.
आरोपी रमजान हा पत्नी शहनाज (वय ३०) व आई रेणुका हिच्यासह राहायचा. त्यांना पाच वर्षांची मुलगीही झाली होती. परंतु घटनेच्या नऊ महिन्यांपूर्वी बाप रमजान व आजी रेणुका यांनी त्या मुलीचा खून करून मृतदेह अक्कलकोट एसटी बसस्थानकाच्या मागे फेकून दिला होता. हे प्रकरण उजेडात आले नसले तरीही याच कारणावरून घरात पत्नी शहनाज हिच्याशी वारंवार भांडणे व्हायची. त्यातूनच २ ऑगस्ट २०१८ रोजी रमजान याने आई रेणुका आणि शेजारीण शाहीन यांनी मिळून शहनाजला बेदम मारहाण केली. यात ती बेशुद्ध पडली. तिला रिक्षाचालक दिलावर सौदागर याच्या रिक्षातून अक्कलकोटच्या सरकारी रुग्णालयाच्या मोकळ्या मैदानात आणत अत्यंत क्रूरपणे खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून रमजान याने तो रेल्वे मार्गावर आणून मृतदेह टाकून दिला. अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी केलेल्या तपासात सत्य समोर आले. या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी १७ साक्षीदार तपासले. यात परिस्थितीजन्य पुरावाही महत्त्वाचा मानला गेला. अॅड. राजपूत यांनी, आरोपींचे कृत्य क्रूरतेचा कळस असल्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. परंतु हा खटला दुर्मीळातील दुर्मीळ नसल्यामुळे तीनही आरोपींना जन्मठेप तर चौथ्या आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली गेली.