देशात नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांहून कमी; केरळमध्ये १७ हजार
देशातील कोरोना बाधितांची संख्या अनेक दिवसांनी ३० हजारांच्या खाली आली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात ३० ते ४० हजारांच्या दरम्यान कोरोना रुग्ण आढळत होते. त्यानंतर तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा धोकाही व्यक्त केला होता. गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे २९ हजार ६१६ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात एकूण ३ कोटी ३६ लाख २४ हजार ४१९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ३ लाख १ हजार ४४२ सक्रीय रुग्ण आहेत. तर ३ कोटी २८ लाख ७६ हजार ३१९ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे ४ लाख ४६ हजार ६५८ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाविरोधात लढ्यामध्ये लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. देशात आतापर्यंत ८४ कोटी ८९ लाख २९ हजार १६० जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. तर गेल्या २४ तासात ७१ लाख ४ हजार ५१ जणांना लस दिली आहे.
भारतात सर्वाधिक चिंता केरळने वाढवली होती. तिथेही आता रुग्णांची संख्या कमी होत आहे. शुक्रवारी केरळमध्ये १७ हजार ९८३ नवे रुग्ण आढळले तर १२७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यातील बाधितांची संख्या ४५ लाख ९७ हजार २९३ इतकी झाली असून मृतांचा आकडा २४ हजार ३१८ वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी ३ हजार २८६ नवे रुग्ण सापडले तर ५१ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत महाराष्ट्रात ६५ लाख ३७ हजार ८४३ जणांना कोरोनाची लागण झाली. तर १ लाख ३८ हजार ७७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या २४ तासात राज्यात ३ हजार ९३३ जण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यात ३९ हजार ४९१ सक्रीय रुग्ण आहेत.