इराणी नौदलाचे सर्वात मोठे लढाऊ जहाज आग लागून बुडाले
![The Iranian navy's largest warship was engulfed in flames](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/kharg-irans-biggest-ship.jpg)
तेहरान |
इराणी नौदलाच्या सर्वात मोठ्या लढाऊ जहाजाला आग लागून बुधवारी ते ओमानच्या आखातात बुडाले. या घटनेचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, असे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. इराणचे मुख्य तेलक्षेत्र असलेल्या बेटाच्या नावाने नामकरण करण्यात आलेले ‘खार्ग’ हे लढाऊ जहाज वाचवण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्याचे वृत्त फार्स व तस्नीम या निमसरकारी वृत्तसंस्थांनी दिले. मध्यरात्री अडीचच्या सुमारास आगीला सुरुवात झाली आणि अग्निशमन दलाने ती विझवण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्याचा उपयोग न होऊन हे जहाज होर्मुझच्या आखातानजीक तेहरानच्या ईशान्येला सुमारे १२७० किलोमीटर अंतरावर ओमानच्या आखातात असलेल्या ‘जस्क’ या इराणी बंदरात बुडाले. जहाज ज्वाळांनी वेढले जात असताना लाइफ जॅकेट घातलेले खलाशी जहाज रिकामे करत असल्याचे इराणी समाजमाध्यमांवरील छायाचित्रांत दिसून आले. जहाजातून निघणाऱ्या दाट काळ्या धुराचा व्हिडीओ फार्स वृत्तसंस्थेने जारी केला.