जलतरणप्रेमींची गर्दी थंडीमुळे ओसरल्याचे चित्र
हिवाळ्यात थंडीच्या वाढत्या प्रभावामुळे नागरिकांनी तरण तलावाकडे पाठ फिरवली
नाशिकरोड : येथील जलतरण तलावावर नियमित पोहायला येणाऱ्या जलतरणप्रेमींची गर्दी थंडीमुळे ओसरल्याचे चित्र आहे. आरोग्यासाठी जागरूकता निर्माण झाल्याने व पोहण्यासारखा उत्तम व्यायाम दुसरा कोणताच नसल्याचे लक्षात आल्याने एरवी मोठ्या प्रमाणात तलावावर हजेरी लावणाऱ्यांच्या संख्येत वाढत्या थंडीत घट झाल्याचे दिसून येत आहे. हिवाळ्यात थंडीच्या वाढत्या प्रभावामुळे नागरिकांनी तरण तलावाकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येते.
याशिवाय, थंडीत आरोग्यासंबंधी त्रास होऊ शकतो या भीतीनेही नागरिक जलतरणाला पसंती देत नसल्याचे बोलले जात आहे. नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ तरण तलाव हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मानांकनप्राप्त तलाव मानला जातो. या तलावात एकाच ठिकाणी कॉम्पिटिशन, डाइविंग, बेबीपूल व महिलांसाठी विशेष इनडोअर ट्रेनिंग व सरावासाठी पाच पूल आहेत. तसेच याठिकाणी दिव्यांगांना विशेष प्रशिक्षणाची सुविधा असून त्यांचीही स्पर्धेसाठी आवश्यक ती तयारी केली जाते.
हेही वाचा : महारेराकडून ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जारी
नाशिकरोड येथील तरण तलाव स्पर्धेसाठी विशेष प्रसिद्ध असून याठिकाणी विविध स्पर्धांचेही आयोजन केले जाते. आता नुकत्याच सिंधूदुर्ग (मालवण) येथे जलतरण संघटनेमार्फत आयोजित स्पर्धेत नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ तरण तलावातील ८५ स्पर्धकांनी सहभाग घेत स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. महापालिका उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, तलावाच्या व्यवस्थापिका माया जगताप व माजी नगरसेवकांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांचा पदक, करंडक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.




