breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीलेख

विशेष लेख : इंटरसेप्टिंग आणि व्हॉट्सॲप कॉल; तो गुन्हाही व्हॉट्सॲप कॉल आदेशानंतर!

आपण कोणाशी, कधी, कस आणि कुठे असताना नेमकं काय बोललो हे तपास यंत्रणांना सहज कळू शकते. यात कोणतेही रॉकेट सायन्स बिलकूल नाही. परंतु, टेक्नॉलॉजीचाच हा एक भाग असताना व्हॉट्सॲप कॉल सध्या तपास यंत्रणांना अडथळा ठरू पाहत आहे. मात्र, व्हॉट्सॲपद्वारे झालेला कॉल तपास यंत्रणांना समजत नाही किंवा आपण काय उद्योग केलाय हे त्यांच्या लक्षात येतं नाही हे अजिबात खर नाही. पण हे सगळं आज लिहिण्याची दोन महत्त्वाची कारणे आहेत. एक म्हणजे नुकतच दिल्ली स्पेशल सेलने देशभरात केलेल्या धाड सत्रात काही संशयित दहशतवादी पकडले गेले. तर दुसरीकडे सामान्य लोकांसाठी खासगी गप्पा, व्हिडीओ कॉल एवढ्यापुरताच मर्यादित असलेला व्हॉट्सॲप कॉल आज शासकीय दैनंदिन कामकाजात अशासकीय पद्धतीने आदेश देण्यासाठी वापरला जातं असल्याचे दिसून येत आहे.
– रोहित आठवले, पत्रकार, पिंपरी-चिंचवड.
कोणत्याही स्वरूपाचा कॉल शोधण्याची प्रक्रिया असलेल्या प्रणालीतील एक भाग म्हणजे इंटरसेप्टींग.. त्यात थेट संभाषण (सगळेच खुलून लिहिणे संयुक्तिक नाही) समजण्याची ताकद आज आपल्या भारतातील सर्वच तपास यंत्रणा, स्थानिक पोलिस आणि इतर काही शासकीय तपास संस्थांकडे आहे. दिल्ली स्पेशल सेलने केलेल्या कारवाईतून काही धक्कादायक खुलासे झाल्याचे सांगितले जात आहे. पण नेहमी प्रमाणे हे सगळं पहिले दिल्लीला कसे समजले, आपल्याला (राज्याला) का नाही समजले, आपले इंटेल कुठे बिझी आहे असे प्रश्न वेगवेगळ्या पातळीवर उपस्थित केले जात आहेत.
राज्यात गाजत असलेल्या पोलिसांच्या तथाकथित कॉल रेकॉर्डिंग (इंटरसेप्टिंग) मुळे संशयितांचेही कॉल ट्रेसिंगचे (किंवा अजून काही म्हणा) प्रमाण सध्या कमी झाले आणि ते इनपूट राज्य पातळीवर मिळण्यास उशीर झाला; असा समज करून दिला जात आहे. यासगळ्यातून कुठेतरी इमेज बिल्डिंग (किमान ढासळू नये) चा प्रयत्न बातम्यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे.
राज्यात सत्तांतर होताच, सध्या गाजत असलेले पोलिसांचे तथाकथित इंटरसेप्टिंग प्रकरण समोर आणले गेले. अगदी हातघाईवर येऊन या प्रकरणावरून पुन्हा सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न झाल्याचे सगळ्यांनी पाहिले आहे. पण इंटरसेप्टिंग पहिल्यांदाच झाले का? हा प्रश्न मागील सर्वच महामहीम यांनी स्वतः ला जरी विचारला तरी त्याचे उत्तर नाही असेच असू शकते.
तर दिल्ली स्पेशल ने केलेल्या कारवाईतून पुन्हा चर्चेला आलेला मुद्दा हा की; कथित इंटरसेप्टिंग प्रकरणात अनेकांचे हात पोळले. त्यामुळे वादंग उठल्याने नको ते लचांड म्हणून, सध्या संशितांवर लक्ष ठेवताना इंटरसेप्टींग हा विषय अधिकाऱ्यांकडून ऑप्शनल टाकला जातोय आणि या सगळ्यामुळे आपल्याला (राज्याला) इनपुट मिळण्यास उशीर झाला.. ही अशी सांगड बातमीच्या मदतीने आत्ता घालणं हे निव्वळ बालिशपणा ठरू शकते; सर्वच महामहीम किमान मनातल्या मनात तरी हे नक्कीच मान्य करतील.
पोलिस असो वा पहिल्या फळीतील शासनकर्ते त्यांना इंटरसेप्टिंग हा प्रकार नवा नाही. पुण्यातील याचे गाजलेले एक प्रकरण म्हणजे, आज बड्या पदावर नियुक्त असणाऱ्या तीन पदाधिकाऱ्यांवर काही वर्षांपूर्वी दंगल भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत पुण्यात खटला चालविला गेला होता. तेव्हा दंगल झाली होती पण, त्या तिघांवर आरोप ठेवला गेला होता तो इंटरसेप्टींगच्या हवाल्यानेच.. कालांतराने हा खटला निकाली निघाला. त्यामुळे हे एवढं सगळं आत्ताच हे नेते मंडळी का मनाला लावून घेतात हे न उलगडणारे कोडे आहे.
इंटरसेप्टिंग आणि व्हॉट्सॲप कॉल हे सगळं लिहिण्याचे दुसरे कारण म्हणजे पिंपरी चिंचवड मध्ये काही महिन्यांपूर्वी एक गुन्हा दाखल झाला. करोना, महानगरपालिका आणि ठेकेदारी या सगळ्याशी त्याचा थेट संबंध जोडला गेला. कोणाच्यातरी सांगण्यावरून वादंग उठले आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले.
करोनामुळे लोक जगतात की मरतात अशी महामारीची परिस्थिती असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा कांगावा केला गेला. त्यासाठी आवश्यक पत्रव्यवहार घडवून आणला गेला. पण हे सगळ काही दिवसातच अंगलट आले. या सगळ्याला कारणीभूत ठरणाऱ्यांमध्ये महत्वाचा भाग होता तो म्हणजे एक व्हॉट्स ॲप कॉल..!
डॉक्टर असलेल्या एका तपास अधिकाऱ्याने व्हॉट्सॲप कॉल करून वरिष्ठ निरीक्षकाला या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे फर्मान सोडले. व्हॉट्सॲप कॉलचा आदेश कसा मानायचा, या संभ्रमात निरीक्षक असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालयात ड्राफ्ट केलेली रेडिमेड फिर्याद घेऊन तक्रारदार अवघ्या काही मिनिटांत पोलिस ठाण्यात दाखल झाला.
त्या “डॉक्टरांच्या” सल्ल्यानुसार त्याने व्हॉट्सॲप कॉल करून निरीक्षकाचे बोलणे करून देत आपले इप्सित साधले. पहिली, दुसरी लाट सरली म्हणत या प्रकरणावर आता पडदा टाकला जात आहे. करोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत आहेत. पण ठेकेदार आणि संबंधित वरिष्ठ निरीक्षक नुकतेच बदलले गेले; मात्र डॉक्टर तेथेच असून त्यांनी केलेल्या या व्हॉट्सॲप कॉलची चर्चा आता शहरात सुरू झाली असून, अती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या कॉलची दखल घेतल्याचे समजते.
एकाच जमिनीचे अनेक मालक कागदोपत्री बदलणे. त्यानंतर बनावट दस्तऐवज करून प्लॉटींग करून विक्री करणे आदी प्रकरणातील संशयित राज्याबाहेर पळून जाण्यापूर्वी संबंधित भागातील एक अधिकारी आणि एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या संपर्कात व्हॉट्सॲप कॉलद्वारे होता हे पण आता उघड होत आहे. महापालिकेत मध्यंतरी झालेल्या एका बड्या कारवाईनंतर संबंधित काही लोकांनी व्हॉट्सॲप कॉलद्वारे काम झाले असा निरोप मुंबईत दिल्याची चर्चा ही सध्या सुरू आहे. त्यामुळे महानगरालिका निवडणुकीच्या तोंडावर व्हॉट्सॲप कॉलचा “बूस्टर डोस” नेमका कोणाला टोचला जातो हे येत्या काळातच स्पष्ट होईल. दरम्यान, जाताजाता… दुर्बीण लावून क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्यांना पकडल्यावर त्यांना “फ्री हिट” देण्यासाठी झालेला व्हॉट्सॲप कॉलही रडारवर आला असून, टेक्नॉलॉजी क्रॅक करायलाही दुसरी टेक्नॉलॉजी पण असते हे सगळ्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button